भर कोर्टात थरार! “तो प्रसंग आठव आणि तूच सांग काय शिक्षा देऊ?”; न्यायाधीशांच्या थेट प्रश्नाने नराधम भीमराव कांबळेची बोबडी वळाली!

Swarajyatimesnews

स्वराज्य टाइम्स वृत्तसेवा

संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या खटल्यात विशेष न्यायालयाने ऐतिहासिक आणि अत्यंत वेगवान सुनावणी घेत नराधम आरोपी भीमराव कांबळे याला सर्व आरोपांखाली दोषी जाहीर केले आहे. अवघ्या ५५ दिवसांत न्यायालयाने हा निकाल दिला असून, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कोर्टरूममध्ये न्यायाधीशांनी आरोपीला थेट विचारलेल्या एका प्रश्नाने नराधमाची बोलतीच बंद झाली! ( Nasarapur rape case)

न्यायाधीशांचा थेट सवाल अन् आरोपीचा नवा बनाव – सर्व कायदेशीर पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपी भीमराव कांबळे याला थेट पिंजऱ्यात उभे करून विचारले, *”तुझ्या विरोधात सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. तुझ्यासमोर फाशी, जन्मठेप किंवा किमान २० वर्षांची कोठडी असे ( Nasarapur rape case)

पर्याय आहेत. तो प्रसंग आठव आणि आता तूच सांग, तुला काय शिक्षा मिळावी?” न्यायाधीशांच्या या थेट आणि करड्या प्रश्नावर नराधम भीमराव कांबळेची पूर्णपणे बोबडी वळाली. मात्र, पश्चात्ताप व्यक्त करण्याऐवजी त्याने सहानुभूती मिळवण्यासाठी कोर्टातही उघडपणे खोटं बोलत नवा बनाव रचला. तो म्हणाला, *”मी तिला खाऊ देण्यासाठी घेऊन जाताना खाली पडलो आणि तिच्या डोक्याला मार लागला. मी तिला मारलेलं नाही…”* आरोपीचा हा धादांत खोटेपणा पाहून कोर्टात उपस्थित असलेले सर्वजण अवाक झाले. न्यायाधीशांनी त्याला तातडीने अडवत सुनावले कि, *”तू सांगत असलेला हा आता इतिहास झाला आहे, तू गुन्ह्यात दोषी ठरला आहेस!”

शवविच्छेदन अहवालातील थरकाप उडवणारे वास्तव! – तपासादरम्यान आणि शवविच्छेदन अहवालातून समोर आलेली माहिती अत्यंत हृदयद्रावक आहे. नराधमाने चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून एका गोठ्यात नेले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केले. चिमुकलीच्या शरीरावर तब्बल १८ गंभीर जखमा आढळल्या. नराधमाने अवघ्या १९ मिनिटांत या जखमा दिल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नोंदवले की, नराधमाने मुलीच्या मृत्यूनंतरही तिच्या मृत शरीरावर अत्याचार केले.

आई-वडिलांचा काळजाचा तुकडा गेला; कोर्टातच फुटला अश्रूंचा बांध! – न्यायालयाने जसा आरोपीला दोषी घोषित केले, तसा कोर्टात उपस्थित असलेल्या चिमुकलीच्या आई-वडिलांना आणि आजीला अश्रू अनावर झाले. पोटचा काळजाचा तुकडा गमावलेल्या आई-वडिलांनी भर कोर्टात धाय मोकलून रडायला सुरुवात केली. त्यांच्या या काळीज चिरणाऱ्या आक्रोशाने कोर्टातील वातावरण प्रचंड जड झाले होते.

विशेष सरकारी वकिलाकडून ‘मृत्यूदंडाची’ मागणी – विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात सरकारची बाजू अत्यंत भक्कमपणे मांडली. त्यांनी कोर्टाला सांगितले की, आरोपी २५ तारखेपासूनच पीडित बालिकेची रेकी करत होता. हा अत्यंत क्रूर आणि विकृत गुन्हा असून अशा व्यक्तीला जगण्याचा कोणताही अधिकार नाही. आरोपी यापूर्वीही अशा गुन्ह्यांत सामील असल्याने तो कोणत्याही दयेस पात्र नाही, त्यामुळे त्याला फाशीचीच (मृत्यूदंड) शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी सरकारी वकिलांनी केली.

२९ जून रोजी अंतिम शिक्षेची घोषणा; संपूर्ण राज्याचे लक्ष! – या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते, संतप्त नागरिकांनी मुंबई-बेंगळुरू महामार्गावर तब्बल ४ तास रास्ता रोको केला होता. आता न्यायालयाने या संवेदनशील प्रकरणाचा निकाल राखून ठेवला असून, २९ जून रोजी नराधम भीमराव कांबळेला अंतिम शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालय त्याला फाशीची शिक्षा ठोकणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!