गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार गणेश फडतरेची एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात रवानगी

Swarajyatimesnews

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा

पुणे शहरालगत वेगाने विकसित होत असलेल्या शिक्रापूर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारास महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.

गणेश भाऊसाहेब फडतरे (वय ३५, रा. फडतरेवस्ती, कोरेगाव भीमा, ता. शिरूर) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध शिक्रापूर व लोणीकंद पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव जमवून अग्निशस्त्रासह हल्ला, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी तसेच अल्पवयीन मुलाचे अपहरण करून मारहाण अशा गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.

तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक गायकवाड यांनी आरोपीच्या गुन्हेगारी कारवायांचा सविस्तर अभ्यास करून त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रस्तावातील पुरावे व आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास ‘धोकादायक व्यक्ती’ म्हणून स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार यांच्यामार्गदर्शनाखाली करण्यात आली. तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी प्रस्ताव तयार केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर तसेच रोहिदास पारखे, अमोल दांडगे, श्रीमंत होणमाने, शिवाजी चितारे, मच्छिंद्र निश्चित, राम जाधव आणि नारायण वाळके यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!