श्रमदान, वृक्षारोपण अन् शिवविचारांचा संगम ‘आपला मावळा’ने चेतवली इतिहास संवर्धनाची ज्योत  

Swarajystimesnews

आपला मावळा’च्या मोहिमेत वढू-तुळापूर येथे स्वच्छता, वृक्षारोपण आणि शिवव्याख्यान, ‘गड-किल्ले संवर्धनास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरेगाव भिमा (ता . शिरूर) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या वढू-तुळापूर भूमीत इतिहास संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संगम अनुभवायला मिळाला. खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून कार्यरत असलेल्या ‘आपला मावळा’ संघटनेच्या वतीने आयोजित गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिमेला महाराष्ट्रभरातील शिवप्रेमी, इतिहासप्रेमी युवक-युवती आणि शंभूभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे सकाळी लवकरच स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. मावळ्यांनी ऐतिहासिक परिसरातील कचरा संकलन करून स्वच्छता केली, झाडाझुडपे हटवून परिसराची निगा राखली. तुळापूर येथे विविध स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करून हरित वारसा जपण्याचा संकल्प करण्यात आला. इतिहास आणि पर्यावरण संवर्धनाची प्रभावी सांगड घालणारा हा उपक्रम ठरला.

मोहिमेचे विशेष आकर्षण ठरलेल्या शिवव्याख्यानांमध्ये इतिहास अभ्यासकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, लोकाभिमुख प्रशासन आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्यगाथेवर प्रकाश टाकला. या व्याख्यानांतून युवकांना राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक उत्तरदायित्वाची प्रेरणा मिळाली.

सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड आणि नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या मावळ्यांच्या उपस्थितीने वढू-तुळापूर परिसर भगवामय झाला होता. छत्रपतींच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या वढू-तुळापूर भूमीत खासदार निलेश लंके यांच्या ‘आपला मावळा’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणारी स्वच्छता व श्रमदान मोहीम ही इतिहास, संस्कृती आणि स्वराज्याच्या वारशाच्या जतनासाठी दिशादर्शक आहे. छत्रपतींप्रती कृतीतून व्यक्त केलेली ही कृतज्ञता असून, विशेषतः तरुण पिढीला इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्याची आणि संवर्धनाची प्रेरणा देणारी आहे.”प्रफुल्ल शिवले, सदस्य, पुणे जिल्हा परिषद.

गड-किल्ले हे स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे जिवंत साक्षीदार  -खासदार निलेश लंके 

गड-किल्ले हे स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत. त्यांचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा जागर घराघरात पोहोचविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, तोपर्यंत गड-किल्ले स्वच्छता व संवर्धनाची ही चळवळ अविरत सुरू राहील,” – खासदार निलेश लंके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!