२०२१ ते २०२६ : कथित लाच मागणी ₹२० हजारांवरून ₹१० लाखांवर वाटचाल ; लाचेच्या रक्कमेत तब्बल ५० पट वाढ
पुणे, दि. ४ :
पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील एका व्यावसायिक प्रकल्पाच्या खोदकामाच्या पंचनाम्याशी संबंधित प्रकरण दडपण्यासाठी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील तलाठी अश्विनी दत्तात्रय कोकाटे (वय ३७) व कोतवाल महेश मधुकर मुंडे (वय ३०) यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने खोदकाम कंत्राटदार आहेत. त्यांनी पुण्यातील ९६७, सेनापती बापट रोड येथील एका व्यावसायिक प्रकल्पाच्या इमारतीच्या पाया खोदकामाचे काम केले होते. या कामाचा पंचनामा तलाठी अश्विनी कोकाटे यांनी केला होता. पंचनाम्यात ३२०० ब्रास जास्त खोदकाम झाल्याचे नमूद करून त्याबाबत तहसीलदारांकडे सादर होणारा पंचनामा महत्त्वाचा ठरू नये, यासाठी तक्रारदाराकडे १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने १५ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १६ जून २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत तलाठी अश्विनी कोकाटे यांनी कोतवाल महेश मुंडे यांच्या माध्यमातून १० लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच कोतवाल महेश मुंडे यांनी ही रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून तलाठी कोकाटे यांच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचेही तपासात समोर आले.या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३३ वाजता नोंदविण्यात आला.
या प्रकरणातील पडताळणी व कारवाई पोलीस निरीक्षक आसावरी रेंडे यांनी केली. या कारवाईवर पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांचे पर्यवेक्षण होते. तर या पथकाला पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
लक्षवेधी बाब म्हणजे, २०२१ मध्ये शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथे ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदणीसाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यापैकी सहाय्यकास २० हजार तर तलाठी अश्विनी कोकाटे यांना २० हजार रुपये प्रकरणी अटक झाली होती.
पाच वर्षांत लाचेच्या रकमेत तब्बल ५० पट वाढ! – १३ फेब्रुवारी २०२१ रोजी ४.३० च्यादरम्यान ₹२० हजारांच्या लाचप्रकरणी अटक, तर अवघ्या पाच वर्षांत म्हणजे ४ ऑगस्ट २०२६ रोजी थेट ₹१० लाखांच्या लाच मागणीप्रकरणी गुन्हा. या दोन स्वतंत्र प्रकरणांतील रकमेची तुलना केली असता कथित लाच मागणीच्या रकमेत तब्बल ५० पट वाढ झाल्याचे दिसून येते. १,९९८ दिवसांच्या कालावधीत ही वाढ सरासरी प्रतिदिन सुमारे ₹४९०.५० इतकी तर दरमहा सुमारे ₹१४९१५ आणि दरवर्षी सुमारे ₹१.७९ लाखांनी वाढल्याचे चित्र समोर येते. एकाच तलाठ्याचे नाव पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत समोर आल्याने महसूल विभागातील नियंत्रण व्यवस्था, विभागीय शिस्त आणि भ्रष्टाचारविरोधी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या परिणामकारकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एसीबीचे नागरिकांना आवाहन – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास ताबडतोब एसीबीला कळवावे. एसीबी, पुणे येथे भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन १०६४ वर किंवा dysacbpune@mahapolice.gov.in या ई-मेलवर तक्रार दाखल करता येते.
.
