मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या शिरूर दौऱ्यात शिक्षण-आरोग्य सुविधांवर भर

Swarajyatimesnews

शिक्रापूर-कोयाळीच्या विकासाला नवी गती

स्वराज्य टाईम्स न्यूज

शिक्रापूर आणि कोयाळी गावठाण परिसरातील रखडलेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या उपस्थितीत विशेष पाहणी दौरा आणि आढावा बैठक पार पडली. शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भात झालेल्या सखोल चर्चेमुळे परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असून प्रशासनानेही विविध मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे संकेत दिले आहेत.

कोयाळी गावठाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन शाळेसाठी चार मजली सुसज्ज इमारत उभारण्याचा प्रस्ताव यावेळी प्रमुख चर्चेचा विषय ठरला. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश देत कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. याचबरोबर विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी उच्च क्षमतेचे आरओ फिल्टर बसविणे, दोन सुसज्ज शौचालय व बाथरूम युनिट उभारणे तसेच २५ बाय १०० आकाराचे बहुउद्देशीय सभागृह उभारण्याबाबतही सकारात्मकतः चर्चा करण्यात आली.

शिक्षणासोबतच ग्रामीण आरोग्य सुविधांनाही या दौऱ्यात विशेष प्राधान्य देण्यात आले. शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात अद्यावत ऑपरेशन थिएटर आणि शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अधिकृत मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी स्थानिक प्रतिनिधींनी रुग्णालय सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली. जिल्हा परिषद सदस्य मोनिका हरगुडे यांनी रुग्णालयात डायलेसिस युनिट सुरू करण्याची आग्रही मागणी करत आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाचा मुद्दा मांडला. शिरूर पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ सासवडे यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले.

पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वाढत्या विद्यार्थ्यांमुळे अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता निर्माण झाली असून, त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. चासकमान विभाग आणि वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील अतिरिक्त जागेचा विकासकामांसाठी वापर करता येईल का, याचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. या पाहणीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर प्रशासन स्तरावर गांभीर्याने हालचाली सुरू झाल्याचे दिसून आले.

या पाहणी दौऱ्यात शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ सासवडे, विस्ताराधिकारी आर. आर. राठोड, शिक्रापूर ग्रामपंचायत प्रशासक तथा सरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत अधिकारी नंदकुमार वैद्य, राजाभाऊ मांढरे, मयूर करंजे, पूजा भुजबळ यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे विविध विभागांचे अधिकारी, अभियंते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक पातळीवरील वाढत्या गरजा, ग्रामस्थांच्या अपेक्षा आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका यामुळे शिक्रापूर-कोयाळी परिसरातील विकासकामांना आता प्रत्यक्ष गती मिळणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!