शिरूर (पुणे): पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अवैध गावठी हातभट्टीचा व्यवसाय तेजीत असताना, शिरूर पोलिसांनी २४ जून २०२५ रोजी एका मोठ्या कारवाईत तब्बल १.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत या व्यवसायाला चांगलाच हादरा दिला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
कण्हेरे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या या गावठी हातभट्टीवर पो.हवा. सुद्रिक, पो.हवा. सांगळे आणि पो.हवा. भवर यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. या छाप्यात ३,२०० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन, तयार हातभट्टीची दारू, तसेच रसायनयुक्त ताडी आणि इतर साधने असा मोठा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, जप्त केलेला सर्व माल जागेवरच नष्ट करण्यात आला.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये सागर गणपत गदगळे (रा. कान्हुर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ११३ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६५(क)(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दारे करत आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत होळ, आणि पोलीस निरीक्षक संदेश केजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली.
पोलीस प्रशासनाचा कडक इशारा:शिरूर पोलिसांनी अवैध हातभट्टी व्यवसायात गुंतलेल्या सर्वांना कडक शब्दात इशारा दिला आहे. अशा बेकायदेशीर उद्योगात सहभागी असलेल्या व्यक्तींनी तात्काळ हे धंदे बंद करावेत आणि कायद्याचा आदर करावा. अन्यथा, पोलीस प्रशासन कठोर पाऊले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे स्पष्टपणे कळविण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.