जिद्द आणि चिकाटीचे यश! जांबूतचा तन्मय गाजरे आता ‘सहाय्यक राज्यकर आयुक्त’; सलग १२ व्या प्रयत्नांनंतर गाठले यशाचे शिखर

Swarajyatimesnews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा

‘प्रयत्नांती परमेश्वर’ या उक्तीचा प्रत्यय शिरूर तालुक्यातील जांबूत येथील तन्मय झुंबर गाजरे याने आणून दिला आहे. अत्यंत कठीण आणि प्रदीर्घ संघर्षातून तन्मयने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले असून, त्याची ‘वस्तू व सेवाकर’ (GST) विभागात सहाय्यक राज्यकर आयुक्त (वर्ग-१)पदी निवड झाली आहे. तब्बल १२ वेळा पूर्व परीक्षा, ८ वेळा मुख्य परीक्षा आणि ३ वेळा मुलाखती असा अंगावर काटा आणणारा प्रवास करत तन्मयने हे यश खेचून आणले आहे.


तन्मयचा शैक्षणिक पाया अतिशय भक्कम होता. प्राथमिक शिक्षण रानमळा आणि आळकुटी येथे झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण त्याने शिरूर आणि जांबूतमध्ये पूर्ण केले. अभ्यासात हुशार असलेल्या तन्मयने गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथून तांत्रिक शिक्षण घेतले आणि त्यानंतर एमआयटी (MIT) कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्रथम क्रमांकाने मिळवली. शालेय वयातच शिष्यवृत्ती आणि MTSE-NTSE सारख्या परीक्षांनी त्याला स्पर्धा परीक्षेची गोडी लावली होती.


इंजिनिअरिंगनंतर त्याचे पहिले स्वप्न देशसेवेचे होते. त्यासाठी त्याने यूपीएससी अंतर्गत सीडीएस, टेरिटोरियल आर्मी आणि नेव्ही पायलट होण्यासाठी प्रयत्न केले. तब्बल ११ वेळा त्याने ‘एसएसबी’ मुलाखती दिल्या, मात्र नशिबाने त्याला तिथे साथ दिली नाही. अनेकजण इतक्या अपयशानंतर खचून गेले असते, पण तन्मयने हार मानली नाही. त्याने आपला मोर्चा एमपीएससीकडे वळवला.२०२१ च्या ‘कम्बाईन’ परीक्षेत राज्यात ४८ व्या क्रमांकासह त्याने ‘स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर’ (STI) पद मिळवले. २०२३ मध्ये या पदावर रुजू झाल्यानंतरही त्याचे ध्येय मोठे होते. नोकरीची जबाबदारी सांभाळत, रात्रीचा दिवस करत त्याने अभ्यास सुरूच ठेवला आणि अखेर राज्यसेवेच्या माध्यमातून थेट ‘वर्ग-१’ पदाला गवसणी घातली.


आपल्या या यशाचे सर्व श्रेय तन्मयने वडील तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक झुंबर गाजरे, आई उज्वला गाजरे आणि आपल्या गुरूंना दिले आहे. “अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतेही ध्येय गाठता येते,” असा विश्वास त्याने या निमित्ताने तरुण पिढीला दिला आहे. तन्मयच्या या गगनभरारीमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी तो आता एक नवा ‘आयकॉन’ ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!