स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
बारामतीमध्ये २३ वर्षीय युवतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी काही तास आधी युवतीने आईला फोन करून, “अथर्व मला त्याच्या घरी घेऊन जाणार आहे, त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो मला गोळी खाण्यास देणार आहे,” अशी माहिती दिल्याचे तिच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी अथर्व राजेंद्र मेहन (वय २७) याच्याविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
मृत्यूपूर्वी आईला फोन; काही तासांतच घडला धक्कादायक प्रकार
६ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता अथर्व कारमधून युवतीला एमबीए प्रवेशाच्या कामासाठी टी.सी. कॉलेज, बारामती येथे घेऊन गेला होता. दुपारी सुमारे ४ वाजता युवतीने आईला मेसेज करून प्रवेश फीबाबत माहिती दिली. त्यानंतर ती अथर्वच्या आई व मावशीला सोडण्यासाठी जात असल्याचे तिने सांगितले.सायंकाळी सुमारे ७ वाजता आईने दोन वेळा फोन केला. फोन न उचलल्याने तिने अथर्वच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी आईचे युवतीशी बोलणे झाले. या संभाषणात युवतीने अथर्व तिला त्याच्या घरी घेऊन जाणार असल्याचे, त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे असल्याचे आणि तो तिला गोळी खाण्यास देणार असल्याचे सांगितल्याचा दावा आईने फिर्यादीत केला आहे.हे ऐकल्यानंतर आईने तिला अथर्वच्या घरी जाऊ नये आणि तातडीने घरी परत यावे, असे सांगितले.
रात्री अचानक प्रकृती बिघडली
रात्री सुमारे ९ वाजता आईने मुलीला मेसेज केला असता तिने जेवण करीत असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर मात्र तिच्या मेसेजला उत्तर मिळाले नाही. रात्री सुमारे १० वाजता आईने फोन केला असता अथर्वने फोन उचलला आणि युवतीला चक्कर आल्याचे सांगितले.यानंतर अथर्व तिला घेऊन आईच्या घरी आला. त्याने युवतीला अचानक चक्कर येऊन पडल्याचे सांगितले. तिला प्रथम देवकाते हॉस्पिटल, त्यानंतर भोंईटे हॉस्पिटल आणि पुढे सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आल्याचे त्याने सांगितले.आई रात्री सुमारे १०.२० वाजता सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्यावेळी युवती स्ट्रेचरवर होती आणि तिची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे आईला समजले.
आधीपासूनच गोळ्या दिल्याचा संशय
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या साधारण १५ ते २० दिवस आधी युवती नेहमीपेक्षा शांत आणि गप्प राहत असल्याचे आईच्या लक्षात आले होते. आईने तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली असता अथर्व युवतीवर शारीरिक संबंधांसाठी आग्रह करीत असल्याचे तसेच तिला काही गोळ्या खाण्यास देत असल्याचे मैत्रिणीने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.युवती आणि अथर्व यांचे प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबीयांमध्ये विवाहाबाबत चर्चाही झाली होती. त्यामुळे या घटनेनंतर युवतीच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे.
नेमकी कोणती गोळी? मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
युवतीला नेमकी कोणती गोळी किंवा औषध देण्यात आले होते का? त्याचे सेवन झाले असल्यास त्याचा तिच्या प्रकृतीवर काय परिणाम झाला? त्याचा तिच्या मृत्यूशी संबंध आहे का? या सर्व बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.मृत्यूचे निश्चित वैद्यकीय कारण, तसेच युवतीला कोणता पदार्थ देण्यात आला होता का, याबाबत वैद्यकीय, रासायनिक, डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात येत आहे. तपास पूर्ण होईपर्यंत मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलिस निरीक्षक शैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.बारामतीतील या धक्कादायक घटनेमागील नेमके गूढ पोलिस तपासानंतरच उलगडणार आहे.
