व्यावसायिक संतोष ज्ञानोबा गावडे जखमी
वाडेबोल्हाई चौकातील आपले ऑफिस बंद करून मर्सिडीज कारने (MH 09 DX 0345) घरी परतणाऱ्या एका ५० वर्षीय व्यावसायिकाला दोन दुचाकींवरून आलेल्या तीन भामट्यांनी अडवून त्यांच्यावर थेट गोळीबार केल्याची थरारक घटना समोर आली आहे. हवेली तालुक्यातील गावडेवाडी (शिरसवडी) येथे पंडित गावडे यांच्या बंगल्याजवळ ५ ऑगस्ट रोजी रात्री १०:३० च्या सुमारास हा धाडसी दरोडा पडला.
या गोळीबारात व्यावसायिक संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५०, रा. गावडेवाडी, शिरसवडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी संतोष गावडे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर गोळी झाडल्यानंतर, त्यांच्या गळ्यातील प्रत्येकी ११ तोळ्यांच्या दोन सोन्याच्या साखळ्या (एकूण २२ तोळे सोने, किंमत रु. ११ लाख) जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी दत्तात्रय महादेव गावडे (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक व्हॅन, डॉग स्क्वॉड आणि इतर पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. तसेच, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-७) अबिनाश कुमार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) गौर हसन, पोलीस उप आयुक्त (एस.बी.) डॉ. प्रशांत अमृतकर, साहाय्यक पोलीस आयुक्त (लोणीकंद) अनिता मोरे, साहाय्यक पोलीस आयुक्त (खराडी) सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (लोणीकंद) सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे, वाघोली) पल्लवी मेहेर आणि पोलीस निरीक्षक (लोणीकंद) प्रविण पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास शेवाळे करत असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
