प्रतिनिधी राजाराम गायकवाड
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. कमलेश आर्या यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. पुणे येथील एमईएस ऑडिटोरियममध्ये आयोजित सोहळ्यात ‘स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप’चे सीईओ निलेश साबे यांच्या हस्ते डॉ. आर्या यांना हा गौरव प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय सन्मानाबद्दल सांसवडी व शिक्रापूर पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांचा नागरी सत्कार केला.
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या ध्येयाने डॉ. आर्या यांनी १९९९ मध्ये ‘सेंट कृष्णा स्कूल’ची स्थापना केली. त्यांच्या या कार्याची दखल सर्वप्रथम दिल्ली येथे घेण्यात आली. आज त्यांच्या प्रेरणेने शिरूर तालुक्यात १०० हून अधिक शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. सध्या ते शिक्रापूर, कोरेगाव भिमा, जालोन आणि गया (बिहार) येथील नामांकित शाळांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य करत आहेत.
शिक्षणासोबतच डॉ. आर्या यांनी सामाजिक क्षेत्रातही मोठे कार्य केले आहे. सन २००० मध्ये पोलीस सुधारणेसाठी त्यांनी नागपूर अधिवेशनासमोर आंदोलन केले. २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनादरम्यान त्यांनी जंतर-मंतर येथे १२ दिवस आमरण उपोषण केले होते. एका पीडित महिलेच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आणून तत्कालीन मंत्री अजित पवार व आर. आर. पाटील यांच्या माध्यमातून गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, भूमाफियांच्या ताब्यातून गरिबांना त्यांच्या जमिनी मिळवून देण्यासाठी ते कार्यरत आहेत.
यापूर्वी त्यांना डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, ‘भारतीय रत्न सन्मान’, लखनौ येथे ‘डॉ. कलाम पुरस्कार’ आणि नवी दिल्लीत ‘समाजरत्न पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नवनाथ येवले, बाबासाहेब दिघे आणि जयश्री तायडे उपस्थित होते. या कार्यक्रमास नागरिक व शिक्षक वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला.
