वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर
२७ मे – मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे महावितरणच्या बारामती मंडलातील ६ उपकेंद्रांमधील ९२४ वीज खांब जमीनदोस्त झाले. यामध्ये ६५७ लघुदाब व २६७ उच्चदाब खांबांचा समावेश आहे.
पावसामुळे बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या तालुक्यांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला होता. बारामती विभागातील लोणी देवकर, भिगवण, सणसर, काळेवाडी आणि केडगाव विभागातील देऊळगाव, मलठण या उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून बहुतांश उपकेंद्रांचा वीजपुरवठा काही तासांतच पूर्ववत केला आहे.
सध्या केवळ २११३ बिगरशेती ग्राहकांचा वीजपुरवठा बंद असून, तो पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. झाडे आणि फांद्या तुटून तारेवर पडल्यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्या खंडित झाल्या, पण सुरक्षेची योग्य काळजी घेतली गेली आणि कुठलाही अपघात टळला.
मुख्य अभियंता धर्मराज पेठकर आणि अधीक्षक अभियंता दीपक लहामगे यांच्या मार्गदर्शनाखाली वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. नियंत्रण कक्ष आणि ‘वॉर रूम’ २४ तास कार्यरत आहेत. आवश्यक साहित्य आणि यंत्रणा तत्पर आहे.
तक्रार कशी नोंदवावी?
वीजपुरवठा बंद झाल्यास ग्राहकांनी 1912, 18002333435 किंवा 18002123435 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच, “NOPOWER<ग्राहक क्रमांक>” असा SMS 9930399303 या क्रमांकावर पाठवूनही तक्रार नोंदवता येते.मोबाईल ॲप व www.mahadiscom.in व www.mahadiscom.in वरूनही सेवा उपलब्ध आहेत.