कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका लॉजमध्ये अमोल शिवाजी आढाव (वय २९, रा. २४ वा मैल, शिक्रापूर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १७ मे) सकाळी उघडकीस आली असून आत्महत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
शुक्रवारी (ता.१६ मे) कोरेगाव भीमा येथील हॉटेल जनता लॉजमध्ये थांबलेला होता. शनिवारी सकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला जात नसल्याने लॉज चालकांनी आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने आणि त्याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावरही संपर्क होऊ न शकल्याने शंका बळावली.
लॉजच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता, अमोल शिवाजी आढाव (वय २९, रा.२४ वा मैल, शिक्रापूर, ता.शिरूर) दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.
ही माहिती मिळताच पोलिसांना खबर देण्यात आली. प्रतीक शिवाजी आढाव (वय ३२, रा. २४ वा मैल, शिक्रापूर) यांनी याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र पाटील करत आहेत.