शिक्रापूर येथे २ कोटींपेक्षा अधिक किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त

Swarajyatimesnews

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाने अवैध मद्य वाहतूक आणि साठ्याविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल २ कोटी ३ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करांचे धाबे दणाणले असून विभागाच्या कारवाईची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

या कारवाईदरम्यान १७१६ बॉक्स अवैध मद्यसाठ्यासह दोन सहाचाकी कंटेनर वाहने जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

प्रथम शिक्रापूर (ता. शिरूर, जि. पुणे) परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी गोवा आणि कर्नाटक राज्य विक्री परवानाधारक मोठा मद्यसाठा आढळून आला. पुढील तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्ग परिसरातून एक कंटेनर ताब्यात घेण्यात आला. या कंटेनरमध्ये बिअर आणि विविध मद्याचे ६९६ बॉक्स आढळले. या कारवाईत सुमारे ८१ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ आणखी एक कंटेनर पकडण्यात आला. या वाहनात विविध राज्यांमध्ये विक्रीसाठी असलेले मद्याचे १०१६ बॉक्स सापडले. विशेष म्हणजे या वाहनांवर बनावट क्रमांक फलकांचा वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत तब्बल १ कोटी २१ लाख ९९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!