पित्याची काळजी, पोलिसांची माणुसकी! तेलंगणात शोधल्या मायलेकी; संसाराचा धागा जोडला!

Swarajyatimesnews

पत्नीचा मोजक्या शब्दांत संवाद अन् अचानक संपर्क बंद; अडीच वर्षांच्या चिमुकलीच्या काळजीने व्याकूळ झालेल्या पित्याला पोलिसांचा मायेचा आधार; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली अजित इंगवले, ललित चक्रनारायण यांची तेलंगणात धडाकेबाज शोधमोहीम!

उदयकांत ब्राम्हणे 

कोरेगाव भिमा (ता. शिरूर)काही क्षणांची शांतताही कधी कधी आयुष्यभराची अस्वस्थता देऊन जाते… एका बाजूला पत्नी कुठे असेल, ती सुरक्षित असेल ना? दुसऱ्या बाजूला आईच्या कुशीत असलेल्या अडीच वर्षांच्या चिमुरडीला काही झाले तर नाही ना? असे असंख्य प्रश्न मनात थैमान घालत असताना पित्याच्या हातात केवळ मोबाईल होता आणि मनात काळजीचा डोंगर! पत्नीचा अचानक आलेला फोन, पलीकडून ऐकू आलेले मोजके शब्द… ‘मी खूप दूर आले आहे, माझ्यासोबत मुलगीही आहे…’ आणि त्यानंतर क्षणार्धात तुटलेला संपर्क! या काही शब्दांनी कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पंकजकुमार यांच्या काळजाचा ठोका चुकवला. पत्नी-मुलीच्या सुरक्षिततेची चिंता असह्य झाल्यानंतर त्यांनी अखेर शिक्रापूर पोलीस ठाणे गाठले. मात्र, त्यांना तिथे केवळ पोलिसांची मदत मिळाली नाही, तर एका अस्वस्थ पित्याच्या वेदनेला समजून घेणारी माणुसकीही अनुभवायला मिळाली.

पंकजकुमार यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता आणि मनातील घालमेल ओळखून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले. एका पित्याची चिंता, आईपासून दूर असलेल्या चिमुकलीची सुरक्षितता आणि संपूर्ण कुटुंबावर ओढवलेली अनिश्चितता यांचा विचार करून त्यांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अजित इंगवले आणि ललित चक्रनारायण यांनी तपासाची सूत्रे स्वीकारत थेट तेलंगणाच्या दिशेने धाव घेतली.

मोबाईलचे शेवटचे लोकेशनही ठोस माहिती देण्यात अपयशी ठरत होते. अनोळखी प्रदेश, भाषेची अडचण आणि मर्यादित माहिती अशा अनेक अडथळ्यांचा सामना करत पोलिसांनी स्थानिक पातळीवर शोध सुरू ठेवला. प्रत्येक प्रयत्नामागे एकच ध्येय होते, ते म्हणजे मायलेकी सुखरूप सापडाव्यात आणि काळजीने व्याकूळ झालेल्या पित्याला दिलासा मिळावा! अखेर तेलंगणातील बेबीनगर परिसरातील एका सिमेंट कारखान्यात काम करत असलेल्या त्या महिलेसह चिमुकलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. मायलेकी सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे शिक्रापूर येथे आणण्यात आले.

मात्र, पोलिसांच्या या मोहिमेचे महत्त्व केवळ मायलेकींचा शोध घेण्यापुरते मर्यादित नव्हते. कौटुंबिक नाराजी आणि तणावातून महिला घराबाहेर पडल्याचे समोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक यादव यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. पती-पत्नीमधील गैरसमज दूर व्हावेत, संवादाची दारे पुन्हा उघडावीत आणि कौटुंबिक प्रश्नांना सकारात्मक मार्ग मिळावा, यासाठी त्यांनी समजूतदारपणे मध्यस्थी केली. कायद्याचे रक्षण करतानाच माणसांमधील नाती जपण्याची पोलिसांची जबाबदारीही त्यांनी या कृतीतून अधोरेखित केली.

पत्नी आणि चिमुकली सुखरूप परतल्याचे पाहून पंकजकुमार यांचा भावनांचा बांध फुटला. कृतज्ञतेपोटी त्यांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यापुढे नतमस्तक होण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादव यांनी त्यांना प्रेमाने सावरत, “सेवा हेच आमचे परमकर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता आणि समाजातील शांतता यांना आमचे प्राधान्य आहे. आमचे कर्तव्य बजावण्याची संधी तुम्ही दिलीत, याबद्दल आम्हीच तुमचे आभारी आहोत,” असे सांगितले.

या शब्दांत पोलिसांच्या वर्दीमागे दडलेली माणुसकी स्पष्टपणे दिसून आली. कारण संकटाच्या काळात एखाद्याला मदतीचा हात देणे ही केवळ नोकरीची जबाबदारी नसते, तर ती माणुसकीची खरी परीक्षा असते. तेलंगणापर्यंत पोहोचलेली शिक्रापूर पोलिसांची ही शोधमोहीम एका कुटुंबासाठी आशेचा किरण ठरली. एका पित्याच्या डोळ्यांतील काळजीचे अश्रू आनंदाश्रूंमध्ये बदलले आणि आईच्या कुशीत पुन्हा विसावलेल्या चिमुकलीच्या सुरक्षिततेने कुटुंबाला दिलासा मिळाला.

कायद्याची वर्दी धाक निर्माण करण्यासाठी असतेच; पण गरजेच्या वेळी तीच वर्दी एखाद्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसणारा आधार बनते, याची प्रचिती शिक्रापूर पोलिसांच्या या कामगिरीतून आली!

‘इंगवले फॅक्टर’ची पुन्हा चर्चा; शारीरिक अडचणींवर मात करत कर्तव्याचा ध्यास! – शारीरिक अडचणींवर मात करून कर्तव्य बजावणारे पोलीस हवालदार अजित इंगवले यांनी या शोधमोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यापूर्वी कोरेगाव भीमा येथून चोरीला गेलेली फॉर्च्युनर गाडी शोधण्यासाठी आंध्र प्रदेशातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. आता तेलंगणात बेपत्ता झालेल्या मायलेकींचा शोध घेण्यातही त्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद ठरली. राज्याच्या सीमा, भाषेची अडचण किंवा वैयक्तिक शारीरिक मर्यादा यांचा विचार न करता तपासासाठी दाखवलेली जिद्द त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची साक्ष देते. त्यामुळे पोलीस वर्तुळात त्यांच्या कामगिरीची पुन्हा चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!