मयूरनगर दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाचा भव्य सोहळा; महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, स्वयंसेवक व बॅरिकेडिंगची विशेष व्यवस्था
उदयकांत ब्राम्हणे
सणसवाडी (ता. शिरूर) येथील मयूरनगर परिसरात दुर्गामातेच्या भक्तीमय जागरासह नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे. मयूरनगर दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दि. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष आकर्षण ठरणाऱ्या ‘शाब्बास होम मिनिस्टर – हा खेळ पैठणीचा’ या महिलांसाठीच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे. दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भव्य विसर्जन मिरवणुकीने उत्सवाची सांगता होणार आहे.
मंडळाचे संस्थापक पंडित दरेकर आणि आधारस्तंभ रामदास दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष लक्ष्मण दरेकर, उपाध्यक्ष अशोक करडे तसेच संचालक मंडळाच्या सहकार्याने धार्मिक वातावरणाबरोबरच महिलांना व कुटुंबीयांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी दुर्गामातेची मूर्तिस्थापना व घटस्थापना माजी पंचायत समिती सदस्या सविता दरेकर, माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, माजी ग्रामपंचायत सदस्या सुनीता उत्तम दरेकर आणि ग्रामपंचायत सदस्या ललिता बाळकृष्ण दरेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दरम्यान, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती आयोजित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचेही नियोजन मंडळाने केले आहे.
‘होम मिनिस्टर’मध्ये महिलांसाठी बक्षिसांची लयलूट राजेंद्र टाक प्रस्तुत ‘शाब्बास होम मिनिस्टर – हा खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकास एलसीडी टीव्ही व पैठणी साडी, द्वितीय क्रमांकास बजाज कुलर, तृतीय क्रमांकास ओव्हन, चतुर्थ क्रमांकास टेबल फॅन, तर पाचव्या क्रमांकास इलेक्ट्रिक किटली देण्यात येणार आहे.
याशिवाय बारामतीकर ज्वेलर्सचे अशोक ढेकळे यांच्या वतीने नथ, पैंजण, जोडवी, चांदीचा छल्ला आणि चांदीचा शिक्का अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला मंडळाच्या वतीने भेटवस्तू देण्यात येणार आहे.
दहा दिवस भक्ती, कला आणि मनोरंजनाची रंगत – नवरात्रोत्सवात ‘नादाला लागू नको माझ्या’, ‘संगीत महाल’, ‘डीजेच्या तालावर’, ‘स्वप्न तारका’, गौरी पुणेकर प्रस्तुत ‘जल्लोष लावण्यावतींचा’, पूजा महापूरे प्रस्तुत ‘रंग नवा ढंग नवा’, ‘ह्या लावणीचा भडका, कॉमेडीचा तडका’, ‘नटखट स्वप्नसुंदरी’ आणि ऑर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दहा दिवस मयूरनगर परिसरात भक्ती, कला आणि मनोरंजनाचा सुरेल संगम पाहायला मिळणार आहे.
भव्य मंडप अन् देवीदर्शनासाठी रेड कार्पेट – धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ३० बाय ५० फुटांचा भव्य मंडप, आकर्षक स्टेज, विद्युत रोषणाई आणि साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी रेड कार्पेटची व्यवस्था करण्यात आली असून, भक्तांना शिस्तबद्ध आणि प्रसन्न वातावरणात दर्शन घेता यावे, यासाठी मंडळाने नियोजन केले आहे.
महिलांच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य – उत्सवाच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने महिला व भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंसेवक आणि बॅरिकेडिंगची व्यवस्था केली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असून, गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्वयंसेवक तैनात राहणार आहेत.
अशोक पवार यांच्या बॅनरचीही चर्चा – सणसवाडी ग्रामस्थ आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यातील जिव्हाळ्याच्या संबंधांची परिसरात चर्चा होत असते. यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमस्थळी माजी आमदार अशोक पवार यांचे मोठे बॅनर, तसेच स्टेजच्या बाजूला लावण्यात आलेले सुमारे दहा फूट उंचीचे बॅनर आणि परिसरातील स्वागत फलक लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे भक्तिमय वातावरणासोबतच कार्यक्रमस्थळी त्यांच्या उपस्थितीही लक्षवेधी ठरत असते.
२५ ऑक्टोबरला भव्य विसर्जन मिरवणूक – नवरात्रोत्सवाची सांगता दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात ते दहा या वेळेत भव्य विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. देवीच्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाची सांगता करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे.
