कोरेगाव भिमा  येथे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा , तीन तास वाहनांच्या रांगाच रांगा

Swarajyatimesnews

 पोलीस मदत केंद्र हाकेच्या अंतरावर; तरीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी गायब! रुग्णवाहिकेसह विद्यार्थी, कामगार, प्रवासी अडकले; नागरिकांचा दोष काय?

उदयकांत ब्राम्हणे

 कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना मंगळवारी वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुतर्फा वाहनांच्या तब्बल चार ते साडेचार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. तीन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिक, कामगार, विद्यार्थी, रुग्ण आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे मुख्य चौकात हाकेच्या अंतरावर पोलीस मदत केंद्र असतानाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुरेसे पोलीस अथवा वाहतूक कर्मचारी घटनास्थळी दिसत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

कोरेगाव भीमात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा; तीन तास वाहनांच्या रांगाच रांगा

https://www.instagram.com/reel/Dd3xN8VinMN/?stkn=MW94Mnd0OGIwYXd6Zw==

कर्णकर्कश हॉर्न, एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, मध्येच रस्त्यात घुसणारी वाहने आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी आणखी वाढत होती. या गोंधळात एक रुग्णवाहिकाही अडकली. शाळा सुटण्याची वेळ असल्याने विद्यार्थ्यांची वाहने, कामगारांची वाहने तसेच पोलिसांचे वाहनही कोंडीत अडकले. रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकत असताना आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक मोकळी करून देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

मुख्य रस्त्यालगत पोलीस मदत केंद्र असताना त्याच परिसरात वाहने तासन्तास अडकत असतील, तर या मदत केंद्राचा उपयोग काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. वाहतूक कोंडी होण्याची ठिकाणे प्रशासनाला नवीन नाहीत. वढू बुद्रुक चौक, हॉटेल गणेश भुवन परिसर आणि डिंग्रजवाडी फाटा ही ठिकाणे वारंवार कोंडीची केंद्रे बनतात. तरीही गर्दीच्या वेळेत वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी तैनात का केले जात नाहीत, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

वढू बुद्रुक चौकात रस्ता ओलांडणारी वाहने, वढूकडून येणारी-जाणारी वाहने आणि डिंग्रजवाडी फाट्याकडे वळणारी वाहने यामुळे वाहतुकीचा खोळंबा वाढत असताना तेथे वाहतूक कर्मचारी किंवा वॉर्डनची व्यवस्था नसल्याचे चित्र होते. परिणामी एका बाजूची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न झाला की दुसऱ्या बाजूला वाहनांच्या रांगा वाढत होत्या.

नागरिकांचाच दोष काय – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र प्रत्येक वेळी नागरिकांनाच दोष देऊन प्रशासनाची जबाबदारी झटकता येणार नाही. वाहतूक कोंडीची ठरावीक ठिकाणे, गर्दीच्या वेळा आणि वाहतुकीचे प्रमुख प्रवाह प्रशासनाला माहिती असताना त्यानुसार नियोजन करणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. नागरिकांनी नियम पाळावेत, पण नागरिकांना तासन्तास रस्त्यावर अडकवून ठेवणे हा वाहतूक व्यवस्थेचा पर्याय होऊ शकत नाही.

तरुणांनी घेतला वाहतूक नियंत्रणाचा ताबा – प्रशासनाच्या यंत्रणेची वाट पाहत बसण्याऐवजी कोरेगाव भीमातील काही तरुणांनी पुढे येत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. सरपंच अनिकेत गव्हाणे, उद्योजक निखिल दौंडकर, नितीन गव्हाणे, मनोज ढेरंगे, काळुराम नरवडे, किरण नानगुडे, पोलिस कर्मचारी इंगोले यांच्यासह स्थानिक नागरिकांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. केवळ दोन पोलिस कॉन्स्टेबल अजित इंगोले, नवनाथ नाईकवडे यांच्या उपस्थितीत नागरिकांनाच वाहतूक नियंत्रित करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणे, ही परिस्थिती संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली.

वाहतूक कोंडी ही कोरेगाव भीमाची रोजची समस्या बनली आहे. मात्र त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी कोंडी झाल्यानंतर धावपळ करण्याची पद्धत सुरूच राहिली तर नागरिकांचा वेळ, इंधन आणि संयम यांचीच किंमत मोजावी लागणार आहे. प्रशासनाने आता केवळ कोंडी सोडवण्यापेक्षा कोंडी होऊच नये यासाठी ठोस वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे.

 मंगळवारी पितृ पंधरवड्यात अनेकांच्याकोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना मंगळवारी वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुतर्फा वाहनांच्या तब्बल चार ते साडेचार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. तीन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिक, कामगार, विद्यार्थी, रुग्ण आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे मुख्य चौकात हाकेच्या अंतरावर पोलीस मदत केंद्र असतानाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुरेसे पोलीस अथवा वाहतूक कर्मचारी घटनास्थळी दिसत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. घरी चौथभरणी असल्याने नातेवाईक, पै पाहुणे, मित्र परिवार यांना कार्यक्रमाला जाण्याची घाई होती पण वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांना मनःस्ताप सहन करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!