कोपर्डीचे आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे निधन

Swarajyatimesnews

२७ वर्षांच्या शैक्षणिक सेवेत हजारो विद्यार्थ्यांना घडविले; सामाजिक-धार्मिक कार्यातही होते अग्रेसर

पुणे, दि. १० : कोपर्डी (ता. कर्जत) येथील आदर्श शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कर्जत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासह कोपर्डी परिसरावर शोककळा पसरली आहे.

कै. किसन चव्हाण यांनी जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल, जलालपूर येथे तब्बल २७ वर्षे उपशिक्षक व क्रीडा शिक्षक म्हणून सेवा बजावली. विद्यार्थ्यांशी आपुलकीचे नाते जपत त्यांनी अनेक पिढ्यांतील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर शिस्त, क्रीडाभावना आणि जीवनमूल्यांची शिकवण दिली.

शिक्षकी पेशासोबत त्यांनी शेतीची जबाबदारीही समर्थपणे सांभाळली. गावची दिंडी, अखंड हरिनाम सप्ताह, भजन तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. उत्कृष्ट वक्तृत्व आणि प्रभावी सूत्रसंचालनाची हातोटी असल्याने गावातील विविध कार्यक्रमांमध्ये त्यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व होते.

कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षणाची दिशा दिली. त्यांचा थोरला मुलगा शुभम अभियंता असून मुलगी श्वेता वैद्यकीय शिक्षण घेत आहे. लहान मुलगा सूरज मोटार मेकॅनिक म्हणून कार्यरत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी अरुणा, मुले शुभम व सूरज, मुलगी श्वेता, भाऊ बबन व महादेव चव्हाण, तसेच बहिणी केशर कळसाईत, सुनंदा थोरात व अलका थोरात असा परिवार आहे. ते राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार विजयराव लोखंडे यांचे मामा सासरे होत.

एक निष्ठावंत शिक्षक, उत्तम क्रीडाप्रेमी आणि सामाजिक जाणिवेचा माणूस हरपल्याने कर्जत तालुका व कोपर्डी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!