मद्यधुंद व्यक्तीसोबत रात्री रस्त्यावर सापडलेल्या तीन वर्षीय बालिकेला पोलिसांनी दिला जीवदानाचा आधार; कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
पोलीस म्हणजे केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारी यंत्रणा नाही, तर संकटाच्या क्षणी धावून येणारा विश्वासाचा हात असतो, याची प्रचिती शिक्रापूरमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून पुन्हा एकदा आली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांच्या सतर्कता, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षतेमुळे रात्री उशिरा भयभीत अवस्थेत सापडलेल्या तीन वर्षीय चिमुकलीला सुखरूप तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शिक्रापूर येथील चाकण चौक परिसरात रात्री सुमारे अकराच्या सुमारास एका मद्यधुंद व्यक्तीसोबत तीन वर्षांची बालिका रस्त्यालगत उभी असल्याचे स्थानिक नागरिक विनोद जाधव, राजू दान आणि राधेश्याम आहेर यांच्या निदर्शनास आले. अंधारात घाबरलेल्या अवस्थेत उभी असलेली चिमुकली पाहताच त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधून पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना माहिती दिली.
माहिती मिळताच देवरे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रथम चिमुकलीला सुरक्षितपणे जवळ घेत तिची समजूत काढली. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत पडलेल्या व्यक्तीच्या खिशातील कागदपत्रांची तपासणी केली. त्यामधून मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत त्यांनी संबंधित कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.
काही वेळातच बालिकेचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. आवश्यक खातरजमा करून पोलिसांनी चिमुकलीला त्यांच्या सुरक्षित ताब्यात दिले. आपल्या मुलीला सुखरूप पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. त्यांनी भावूक होत, “मिलिंद देवरे आमच्यासाठी केवळ पोलीस कर्मचारी नाहीत, तर साक्षात पांडुरंग आहेत,” अशा शब्दांत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
एका निष्पाप चिमुकलीच्या सुरक्षिततेसाठी वेळेवर दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आणि माणुसकीमुळे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी खाकी वर्दीमागील मानवी चेहरा पुन्हा एकदा समाजासमोर आणला आहे. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ कामगिरीबद्दल शिरूर तालुक्यात सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, नागरिकांनी त्यांना मनापासून सलाम केला आहे.
