वारीत काळाचा घाला! जेजुरीत दिंडीच्या ट्रकने सात वारकऱ्यांना चिरडले, तिघींचा मृत्यू

Swarajyatimesnews

चार महिला गंभीर जखमी; ट्रक चालक ताब्यात, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर

जेजुरी : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सोमवारी सकाळी हृदयद्रावक दुर्घटना घडली. सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ दिंडीतील ट्रकने सात वारकरी महिलांना धडक दिल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. जखमींवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.

मृत महिलांची नावे नंदा पवार (वय ६०), माधवी राजाराम सलगरे (वय ५५) आणि राजश्री शंकर भोसले (वय ५५) अशी असून त्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील रहिवासी आहेत.

पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रघुनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीतील ट्रकने बेलसर टोलनाक्याजवळील साईदीप लॉज परिसरात सात वारकरी महिलांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या महिलांना तातडीने जेजुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिघींचा मृत्यू झाला. उर्वरित चार महिलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. चालकाचे नियंत्रण सुटले की वाहनात तांत्रिक बिघाड झाला होता, याबाबत पोलीस सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.

पालखी सोहळ्यावर शोककळा – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे जेजुरीत आगमन झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी घडलेल्या या भीषण अपघातामुळे जेजुरीसह संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली. अनेक वारकरी आणि भाविकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जखमी वारकऱ्यांची घेतली भेट – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरीतील रुग्णालयात जाऊन जखमी वारकरी महिलांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेत जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करत या दुःखद प्रसंगी शासन व प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा विश्वास दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत जाहीर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

https://www.facebook.com/share/1RSAVBpsg8

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!