प्रेमविवाहानंतर सातत्याने छळ; पती, सासू-सासरेसह चौघांविरुद्ध गुन्हा
स्वराज्य टाईम्स न्यूज
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे हुंडा, धोंड्याच्या महिन्यातील सोने-कपडे तसेच माहेरच्या जमिनीतील हिस्सा आणण्यासाठी होत असलेल्या कथित मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी मृत विवाहितेचा पती, सासू, सासरे आणि एका नातेवाईकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे व विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विवाहितेचे नाव ऐश्वर्या अक्षय बटाने (वय २२) असे असून, तिचा दोन वर्षांपूर्वी गावातील अक्षय देविदास बटाने याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर ऐश्वर्याने माहेरच्या शेतजमिनीवरील हक्काचा त्याग केल्याचा राग मनात धरून तिचा पती, सासरे देविदास जालिंदर बटाने, सासू सुवर्णा देविदास बटाने तसेच नातेवाईक शिवाजी ज्ञानेश्वर भंडारे यांनी तिचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ सुरू केला होता.
फिर्यादीनुसार, “माहेरून हुंडा आणला नाही”, “लग्नात योग्य मानपान दिला नाही”, “जमिनीच्या हिस्स्याचा त्याग का केला?”, “तुझ्या वडिलांकडील जमिनीतील हिस्सा घेऊन ये” अशा कारणांवरून ऐश्वर्याला शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवणे आणि सतत मानसिक त्रास दिला जात होता. हा छळ असह्य झाल्यावर ऐश्वर्या अधूनमधून माहेरी जाऊन आई-वडिलांकडे आपली व्यथा मांडत होती. मात्र संसार टिकावा या हेतूने तिची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठविण्यात येत होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सासऱ्यांनी ऐश्वर्या आणि तिच्या पाच महिन्यांच्या बाळाला माहेरी आणून सोडले. त्यावेळी तिने धोंड्याच्या महिन्यातील सोने व कपडे न दिल्यामुळे सासरी मारहाण होत असल्याचे सांगितले. तसेच “रविवारी माझ्या मुलाच्या बारशासाठी येताना सोने घेऊन या,” असा निरोपही सासरच्या मंडळींकडून देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
२० तारखेला गावचे पोलीस पाटील साजिद पटेल यांनी ऐश्वर्याचे वडील अशोक लक्ष्मण उखळे (वय ६२) यांना फोन करून मुलीने गावाजवळील लिगाडे यांच्या शेताशेजारी असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याची माहिती दिली. तातडीने तिला मोहोळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी ऐश्वर्याचे वडील अशोक उखळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अक्षय देविदास बटाने, सासरे देविदास जालिंदर बटाने, सासू सुवर्णा देविदास बटाने आणि नातेवाईक शिवाजी ज्ञानेश्वर भंडारे या चौघांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
