दहिवडीत १२ वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू; घातपात की खून ?

Swarajyatimesnews

ग्रामस्थ आक्रमक, मृतदेह घेण्यास नकार

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे एका १२ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद आणि अत्यंत विदारक अवस्थेत आढळल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. तळेगाव ढमढेरे येथील शाळेत सहावीत शिकणारा साई अनिल मांजरे असे या मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला आरोपींच्या अटकेसाठी १२ तासांचा अल्टिमेटम दिला असून, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास ठाम नकार दिला आहे.

नेहमीप्रमाणे साई दुपारी शाळेतून घरी आला, कपडे बदलले आणि खेळण्यासाठी शेताकडे गेला. मात्र, बराच वेळ तो न परतल्याने शोध घेतला असता, घराशेजारील ऊसाच्या शेतात त्याचा रक्ताळलेला मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, साईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या अंगावर कपडे (पॅन्ट) नव्हते. या धक्कादायक स्थितीमुळे हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात किंवा क्रूर हत्या असल्याचा संशय बळावला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक आणि वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. हा हल्ला वन्य प्राण्याचा आहे की एखाद्या नराधमाचे कृत्य, या दोन्ही बाजू पडताळून पाहण्यासाठी फॉरेन्सिक टीमचीही मदत घेतली जात आहे. मात्र, प्राथमिक पुराव्यांमुळे ही हत्या असण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे.

जुन्या जखमा आणि प्रशासनाचे अपयश – दहिवडी परिसरातील ग्रामस्थांच्या संतापाचे मुख्य कारण म्हणजे दीड-दोन वर्षांपूर्वी घडलेले ‘यश गायकवाड’ प्रकरण. त्यावेळीही एका १० वर्षीय मुलाचा असाच संशयास्पद मृत्यू झाला होता, ज्याचा छडा लावण्यात पोलीस प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. “जर त्यावेळी पोलिसांनी गुन्हेगारांना शोधले असते, तर आज साईचा बळी गेला नसता,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवर आणि गस्तीवर ताशेरे ओढले आहेत.

“आधी खुनी शोधा, मगच मृतदेह न्या,” अशी मागणी करत नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घटनास्थळीच ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू दिला जाणार नाही, असा पवित्रा घेतल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांसमोर केवळ या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावण्याचेच नाही, तर जनतेचा हरवलेला विश्वास पुन्हा मिळवण्याचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे.

तपासातील कळीचे मुद्दे:

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा: मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतरच तपासाची दिशा ठरेल.

यश गायकवाड प्रकरणाचे कनेक्शन: दोन्ही घटनांमधील साम्य तपासून पाहण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

वन्यजीव की मानवी कृत्य: शरीरावरील जखमा प्राण्याच्या आहेत की शस्त्राच्या, याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!