शिक्रापूर : प्रतिनिधी राजाराम गायकवाड
सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेलची चोरी करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच बॅरलमध्ये पाणी भरून ठेवणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक करत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला आहे. सुमारे ७२ हजार रुपयांच्या डिझेल चोरीप्रकरणी आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या इतर गुन्ह्यांचाही तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज कंपनीच्या जनरेटरजवळ ठेवलेल्या बॅरलमधील ८०० लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. चोरी लपविण्यासाठी आरोपींनी बॅरलमध्ये पाणी भरून ठेवत कंपनीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची नोंद शिक्रापूर पोलीस ठाण्यात झाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अक्षय प्रेमचंद देवडे (रा. शिक्रापूर) आणि अविनाश शंकर धुमाळ (रा. रांजणगाव) यांना ताब्यात घेतले. कसून चौकशीत दोघांनीही डिझेल चोरीची कबुली दिली. तपासात अक्षय देवडे याच्यावर यापूर्वी चोरीचे, तर अविनाश धुमाळ याच्यावर दरोड्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे.
चोरीस गेलेले डिझेल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींकडून आणखी अशाच प्रकारचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार रोहीदास पारखे, नारायण मळेकर, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, राकेश मळेकर, नारायण वाळके आणि मच्छिंद्र निचीत यांनी पार पाडली.
