आषाढी वारीच्या भक्तिरंगात विशेष विद्यार्थ्यांची पालखी; वृक्षदिंडीने पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Swarajyatimesnews

शिक्रापूर प्रतिनिधी : राजाराम गायकवाड 

आषाढी वारीचे औचित्य साधत श्री छत्रपती प्रतिष्ठान संचालित निवासी मतिमंद विद्यालय, मैत्री गोल्ड सोसायटी, शिक्रापूर येथे विशेष विद्यार्थ्यांनी साकारलेला पालखी सोहळा आणि वृक्षदिंडी परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वृक्षलागवडीचा प्रभावी संदेश दिला.

कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीच्या पूजनाने झाली. पालखीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची प्रतिकृती तसेच विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुखमाई, वारकरी, टाळकरी, पालखीचे भोई आणि पखवाज वादक अशा विविध वेशभूषा परिधान करून वारीचे जिवंत चित्र उभे केले. विशेष म्हणजे, काही विद्यार्थिनींनी वारकरी महिलांचा पारंपरिक वेश धारण करत डोक्यावर तुळस आणि विविध वृक्षांची रोपे घेऊन वृक्षदिंडीत सहभाग नोंदविला.

शिक्रापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विशालशेठ खरपुडे, सुभाषमामा खैरे आणि संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गाडेकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या अखंड गजरासोबत “झाडे लावा, झाडे जगवा”, “वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी” आणि “वृक्षासारखा परमपवित्र नसे दुजा मित्र” अशा घोषणांनी परिसर भक्तिमय वातावरणासह पर्यावरण जनजागृतीच्या संदेशाने दुमदुमून गेला.

दिंडीचा समारोप विद्यार्थ्यांना गोड जेवण देऊन करण्यात आला. कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेष विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गाडेकर यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत अशा उपक्रमांमधून समाजात सकारात्मक संदेश पोहोचत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!