पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या…
वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) :येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीची छेड काढल्याप्रकरणी ४२ वर्षीय इसमाला शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या प्रकारामुळे तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
शिक्रापूर पोलिस ठाण्यात तरुणीने फिर्याद दाखल केली असून त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणी ही आपल्या कुटुंबासह वाडा पुनर्वसन येथे राहते व एका महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला शिकते. १६ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ती घरी एकटी असताना, शेजारी राहणारा संतोष लांडगे (वय ४२) याने तिच्या घरी येऊन तिचा हात पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच, “मी तुला दररोज ५०० रुपये देतो, तू घरामागे एक तास येत जा” असे अश्लील बोल बोलून तिची छेड काढली.
या प्रसंगी तरुणीने आरडाओरड करत त्याच्या आईला हाका मारल्यावर संतोष लांडगे तेथून निघून गेला. घाबरलेल्या अवस्थेत तरुणीने आईला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीय घाबरलेले असल्यामुळे अखेर त्यांनी २१ मे रोजी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संतोष लांडगे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तेलंग व गायकवाड करीत आहेत.