सरकारी काम आणि सहा महिने थांब.. जोरदार आला पाऊस गेला पूल (भराव) वाहून..
कोरेगाव भिमा (ता.शिरूर) श्री क्षेत्र वढू बुद्रुक – चौफुला रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून बंद असून येथील ओढ्यावरील (पूल) मुरुमाचा भराव पावसाच्या पाण्यात वाहून शेतकऱ्यांच्या गोठ्यात आणि घरात पाणी शिरले तर वढू बुद्रुक ते चौफुला अशी वाहतूक ठप्प झाली असून याला बांधकाम विभाग व लाल फितीतील शासकीय कारभार जबाबदार असल्याचा स्थानिकांनी रोष व्यक्त केला आहे.
मुसळधार पावसाने नागरिकांसह प्रशासनाची चांगलीच धांदल उडवली असून वढू बुद्रुक ते चौफुला या रस्त्यावरील पूल वाहून गेला असून येथे पूर्वी असणाऱ्या पुलाच्या खाली पाणी जाण्यासाठी चार ते पाच नळ्या होत्या त्यातून पाणी वाहून जात होते पण रस्त्याचे काम सुरू झाल्यावर त्यातील फक्त एक नळी पाणी वाहून जाण्यासाठी असल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबले आणि नागरिकांच्या घरात गोठ्यात पाणी शिरल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले.
वढू बुद्रुक ते चौफुला असा सिमेंट काँक्रिट रस्ता बनवण्याचे काम मागील अनेक दिवसांपासून बंद असून बाहेर आलेल्या लोखंडी सळया व मुरुमाच्या रस्त्यावरून नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
नागरिकांच्या जीविताला व आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून त्यांच्या चुकीमुळे आमचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून पावसाळ्यापूर्वी हे काम व्यवस्थित पूर्ण केले असते तर आमचे नुकसान झाले नसते असे शेतकरी दुःख व्यक्त करत कारवाईची मागणी करत आहेत.
यामध्ये भरत शिवले ,एकनाथ शिवले यांच्या गोठ्यात तर सतीश शिवले, भरत शिवले, मोहन शिवले, बाळासाहेब साठे यांच्या घरात पाणी शिरल्याने तर किसण शिवले शेतीचे नुकसान झाले.
वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्यावरील मुरुमाचा भराव अतिवृष्टीमुळे वाहून गेला असून सदर ठेकेदाराला अत्यावश्यक सूचना दिल्या असून संबंधित कामाच्या बाबतीत चौकशी करण्यात येणार असून रस्त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना फलक लावण्याच्या व योग्य काळजी घेण्याचे ठेकेदाराला सांगितले असून सदर घटनेचा तपास करण्यात येणार असून त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. – रणजीत दाईंगडे, अभियंता बांधकाम विभाग,पुणे
संबंधित ठेकेदाराने सहा महिन्यांपासून काम खूप संथगतीने केले असून पुलाच्या नळ्या बंद करणे, मुरूमाचा भराव व्यवस्थित न भरणे तसेच नागरिकांच्या जीविताला धोका होईल व त्यांचे आर्थिक नुकसान होईल हे लक्षात न घेता कामचुकार व निकृष्ट दर्जाचे काम करत असून या कामाची वरिष्ठांनी तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत सदर ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी – सोनू शिवले, शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते वढू बुद्रुक