तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) पुणे जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण क्षेत्रात तळेगाव ढमढेरे आणि रांजणगाव सांडस परिसरासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या गटातील ५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची “मॉडेल स्कूल” (आदर्श शाळा) म्हणून निवड करण्यात आली असून यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
या योजनेअंतर्गत तळेगाव ढमढेरे येथील मळीमळा शाळा आणि घायाळकर वस्ती शाळा, तसेच भांबर्डे, आरणगाव आणि करंजवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची निवड झाली आहे. या शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल सुविधा आणि सुरक्षित व स्वच्छ शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या तोडीस तोड आधुनिक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या परिश्रमांचे हे मोठे फळ मानले जात आहे.
या महत्त्वपूर्ण यशाबद्दल भाजप पदवीधर आघाडीचे (पुणे जिल्हा उत्तर) अध्यक्ष व उद्योजक राहुल नरहरी गव्हाणे यांनी आनंद व्यक्त केला असून, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक सुविधा मिळायला हव्या – दिपाली राहुल गव्हाणे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक सुविधा मिळाव्यात, ही आमची प्रामाणिक इच्छा होती. शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांमुळेच आज आपल्या गटातील ५ शाळांची ‘मॉडेल स्कूल’ म्हणून निवड झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यातील खरी गुरुकिल्ली आहे. या यशात वाटा असणाऱ्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करते. – दिपाली राहुल गव्हाणे (सदस्या, जिल्हा परिषद पुणे)

