तीन पिस्तुले व चार जिवंत काडतुसे जप्त
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत अवैधरित्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तीन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख २४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जून २०२६ रोजी रात्री गस्तीदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे (वय ३१, रा. आमदाबाद, ता. शिरूर) हा न्हावरे गाव हद्दीत पिस्तुल घेऊन फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मंडळ अधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या जागेतून त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासात आरोपी विजय शेंडगे याने बापू कोंडिबा पारखे (वय ३१, रा. सरदवस्ती, निमोणे, ता. शिरूर) याच्याकडून आणखी दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून त्याच्याकडूनही शस्त्रे जप्त केली.
दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता १८ जून २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला विजय उर्फ कोयत्या शेंडगे याच्यावर यापूर्वी खून, जबरी चोरी, विनयभंग आणि मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व गुन्हे शोध पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
