गुंठामंत्री संस्कृती: वैष्णवीचा मृत्यू की सामाजिक नैतिक अधःपतन?

Swarajyatimesnews

गुंठामंत्री संस्कृती’ हा शब्द आज केवळ जमिनीच्या मोजमापापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आपल्या समाजातील संवेदनशीलता, माणुसकी आणि मूल्यांच्या घसरणीचे प्रतीक बनला आहे. एकेकाळी कुटुंबाला आधार देणारी, नात्यांना महत्त्व देणारी समाज रचना आज झगमगाटाच्या दुनियेत हरवून गेली आहे. अचानक आलेल्या श्रीमंतीने भौतिक सुखांचा ढीग दिला असला, तरी नात्यांमध्ये मात्र काळोख साठू लागला आहे.

उद्योगनगरी ते गुंठामंत्री: पुण्यातील बदललेले चित्र –  विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यासारख्या संपन्न जिल्ह्याला गेल्या पंचवीस-तीस वर्षांत मिळालेला उद्योगनगरीचा दर्जा, आयटी पार्क्स, कॉर्पोरेट कार्यालये आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या नागरीकरणामुळे जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. ज्या जमिनीसाठी पूर्वजांनी घाम गाळला, आयुष्यभर काबाडकष्ट केले, तीच ‘काळी आई’ आज विकासाच्या पुरात दबत चालली आहे. कष्ट करून जगण्यापेक्षा जमिनीच्या एका सहीवर कोट्यवधी रुपये मिळत असल्याने शेतकरी पुत्रांना जमीन कसण्याऐवजी विकण्याचा मोह आवरणे कठीण झाले आहे. याला काही प्रमाणात शासन, समाज आणि व्यवस्थाही जबाबदार आहेत.

बिनभरवशाच्या शेतीमध्ये आता तरुणाईला हाडे झिजवून शेतीत मेहनत करण्याऐवजी  खरेदी-विक्रीच्या कागदावर सही करून सुखी जीवन जगणे अधिक पसंत आहे. जितके जास्त एकर क्षेत्र, तितकी जास्त कमाई. या अमाप संपत्तीच्या आगमनाने अनेक ‘गुंठामंत्री’ उदयास आले आहेत. हातात-गळ्यात सोन्याच्या जाडजूड साखळ्या, बोटांत सोन्याच्या अंगठ्या, स्पोर्ट्स आणि फॉर्च्युनर गाड्या, उंची जीवनशैली, देशी-विदेशी दारूचे बार, पब आणि घुंगराच्या तालावर उधळल्या जाणाऱ्या नोटांचा पाऊस हे त्यांचे जीवनमान झाले असून ही तरुण पिढी युवा नेत्यांपासून, गोल्डमॅन ते बिल्डर, उद्योजक बनली आहे. जमीनीचे सौदे करून देणारे दलाल, जेसीबी, पोकलेन, पाण्याचे टँकर, डंपर , खान, क्रशंट, गुंठेवारी व इमारती, फ्लॅट, मोकळी जागा भाड्याने देऊन बक्कळ पैसा कमावत आहेत. यासाठी पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करण्याची किंवा मान मोडून अभ्यास करण्याची गरज नाही, फक्त जमीन विकणारा शेतकरी हवा आहे.

एकेकाळी जेव्हा नात्यांना महत्त्व होतं, तेव्हा मामा, चुलत भाऊ, आत्या, काकू यांचं अस्तित्व घराच्या प्रेमळ चौकटीत होतं. आज ती चौकट भंगली आहे. नव्या युगात नात्यांपेक्षा संपत्ती आणि प्रतिष्ठेला अधिक महत्त्व दिलं जातं. गाडी कोणती आहे, इन्स्टाग्रामवर किती फॉलोअर्स आहेत, हे ठरवतं की समाजात कुणाला मान दिला जातो.

शेतकरी पुत्रांनी व्यवसायात यश मिळवणं अभिमानास्पद आहे, पण यशाबरोबर विनय, नम्रता आणि कुटुंबप्रेम जपणं हे अधिक महत्त्वाचं आहे. मुळाशी असलेली मातीची ओळख, आईवडिलांचा आशीर्वाद, गावकुसातील साधेपणा – हे मूल्य टिकवणं हीच खरी श्रीमंती आहे. मुलांना केवळ ब्रँडेड कपडे आणि महागड्या वस्तू न देता, प्रेम, सहवास, संवाद आणि सुसंस्कार यांची देणं देणं महत्त्वाचं आहे. आजीच्या तब्येतीची चौकशी करणं, बाबांना शेतात पाणी देताना दोन क्षण थांबणं – ही नातीच माणूसपण टिकवून ठेवतात.

मातीचा बदललेला अर्थ: जीवनसाधनापासून सौद्याच्या दस्तऐवजापर्यंत –  पूर्वी शेतकरी ‘काळी आई’ कसत आपले पोट भरायचे. इंच इंच जमीन राखायचे, भावकीशी उभा दावा मांडत कधी कधी तर उभे आयुष्य भावकीच्या विरोधात घालवत, पण जमीन राखत उपाशी राहणे स्वीकारायचे, पण जमीन विकायची म्हटली की डोळ्यात पाणी आणायचे. ‘काळी आई’ विकायची नाही ती राखायची, पुढची पिढी कशी जगेल यावर आपलं आयुष्य कष्टात घालवायचे. जमीन न विकल्याचा अभिमान व स्वाभिमान त्यांच्या कळकट मळकट कपड्यावर काळया आईच्या डागांना दागिन्यासारखा मिरवत शेतकरी, कष्टकरी स्वाभिमानाने जगत होता. झगमगाटात ते हरवले नाही, पण नात्यांना जपत मायेची पाखर मुक्या जनावरांपासून पाहुण्यांपर्यंत सर्वावर असायची. पण आज तिचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. शेतीच्या ओल्या नांगराची जागा कोट्यवधी रुपयांच्या सौद्यांच्या करारांनी घेतली आहे. जमीन केवळ जीवनसाधन राहिली नसून, ती लाखो-करोडोच्या उधळपट्टीच्या संस्कृतीची जननी बनली आहे. हे परिवर्तन केवळ आर्थिक नाही, तर ते पारंपरिक भारतीय मूल्यांवरील आघाताचे प्रतीक आहे.

जमीन कसण्यापेक्षा विकण्याकडे कल वाढला. लग्न, बंगला, व्यवसाय यासाठी शेती विकल्याशिवाय पर्याय नाही हे बिंबवले गेल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती गेली आणि नवनवीन साधनं आली. गाय गोठा,बैल गेली आणि त्यांची जागा विदेशी जातीच्या श्वानांनी घेतली आता चारा नाही तर पे डिग्री, बिस्किटे टाकणारे दिसू लागले , गावातील गावपण हरवले, एकमेकांना अडीअडचणीत धावून येणारी माणसं आता पैशात बोलू लागली. कष्टाच्या घामाच्या सुगंधाची जागा आता उंची सुगंधाने घेतली, मात्र काळया आईचा मन भरवणारा व निसर्ग बहरवणारा सुगंध हरवला. जमीन विकणे ही भूषणावह बाब झाली. शेतकऱ्यांची मुले नवउद्योजक झाली.

पुणे जिल्ह्यातील आणि इतर ग्रामीण भागांतील अनेक गावांमध्ये शेतीच्या जमिनीचे भाव अचानक गगनाला भिडले. अनेक कुटुंबांनी आपली जमीन विकून बिल्डर, एजंट आणि प्लॉटिंगच्या व्यवहारात उतरले. काही वर्षांत लाखो रुपयांचे व्यवहार सुरू झाले, गाड्या, बंगल्यांची रेलचेल झाली. पण याच श्रीमंतीच्या झगमगाटात आपुलकी, शिस्त आणि नैतिक मूल्ये हरवली.

पूर्वी गावात संकट आलं की नात्यांची ओढ भासायची. आता कुठलाही वाद झाला की पोलिस स्टेशन, कोर्ट, वकील यांच्या दरवाजांवर धाव घ्यावी लागते. मोबाईल, स्टेटस, इन्स्टाग्राम रील्स आणि बिझनेस मीटिंग्जच्या गर्दीत आईवडिलांच्या डोळ्यांत डोकावायला वेळ नाही. एकमेकांची चौकशी न करणारा, स्पर्धा आणि प्रतिष्ठेच्या भोवऱ्यात अडकलेला समाज तयार झाला आहे.

‘गुंठेवारी’: केवळ जमिनीचे माप नव्हे, तर नवीन सामाजिक ओळख -“गुंठेवारी” हा शब्द आजकाल केवळ जमिनीच्या परिमाणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो एक नवीन सामाजिक वर्ग, विशिष्ट आर्थिक मानसिकता आणि बदललेली जीवनशैली दर्शवणारा सामाजिक संकेत बनला आहे. पुण्यासारख्या शहरांच्या आसपासच्या मुळशी, भोसरी, हवेली, मंचर यांसारख्या परिसरात एका गुंठ्याचा भाव ३० ते ५० लाखांपर्यंत पोहोचला आहे, म्हणजे एका एकराचा भाव १२ ते २० कोटींच्या घरात जातो. हे आकडे जमिनीच्या किमतीतील अवाढव्य वाढ आणि त्यातून निर्माण झालेल्या नव्या सामाजिक विषमतेचे स्पष्ट चित्र दाखवतात.

वारसाहक्काऐवजी ‘व्यवहार’ आणि ‘गुंठामंत्री’ वर्गाचा उदय – ज्यांनी ही संपत्ती वारशाने मिळवली, त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी कष्ट, शिक्षण किंवा संघर्षाऐवजी थेट ‘व्यवहाराला’ प्राधान्य दिले. यातून जमीनखरेदी-विक्री, दलाली, ठेकेदारी, बिल्डरशाही, पाण्याचे टँकर, जेसीबी, क्रशर, माती खणण्याचे ठेके आणि भपकेबाज इव्हेंट मॅनेजमेंटसारखे व्यवसाय उभे राहिले. शिक्षण, नीती आणि मूल्यांना बाजूला सारून उभ्या राहिलेल्या या व्यवसायांनी एका नवीन ‘गुंठामंत्री’ वर्गाला जन्म दिला आहे. हा वर्ग आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असला तरी, मूल्यांच्या बाबतीत तो दिवाळखोर आहे.

चंदेरी पोकळ श्रीमंती आणि विचारांची दिवाळखोरी – या नवश्रीमंतांच्या घरांमध्ये सोन्याची दागिने, लक्झरी गाड्या, बुलेट-फॉर्च्युनर, विदेशी दारूचे बार, भव्य लग्न समारंभ, फुलांची सजावट आणि सेलिब्रिटींचे डान्स शो हे सर्व ठरलेले असते. मात्र या बाह्य भपक्याच्या आत विचारांचे, सहवासाचे, नात्यांचे आणि माणुसकीचे रिकामेपण आहे. यामुळे एक ‘इव्हेंटबाज’ संस्कृती उभी राहिली आहे, जी सरंजामी मानसिकतेची सुधारलेली आवृत्ती आहे. यात केवळ सत्तेचा, पैशाचा आणि आधुनिकतेचा आभास असला तरी, कष्टकरी विचारांना तिलांजली देत संवेदनशील नात्यांची स्मशानभूमी होताना दिसत असून सुख दुःख वाटून घेण्यासाठी माहेरापेक्षा पैशासाठी कोर्टाची पायरी चढणारी बहिण व भाचे नात्यातील पोकळी दाखवत आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण: एका शोकांतिकेच्या गाभ्याचं वास्तव – वैष्णवी हगवणे हिचे मृत्यू प्रकरण हे या संपूर्ण गुंठामंत्री संस्कृतीच्या ढाच्याला प्रश्न करणारी झणझणीत चपराक आहे. तिचं लग्न, कौटुंबिक वातावरण आणि सासरचे संबंध हे केवळ एक उथळ, दिखाऊ जगणं प्रतिबिंबित करतात. तिच्या नवऱ्याचे वागणे, त्याचे मित्रगट, त्यांची प्रतिष्ठेची संकल्पना आणि त्यामागील संपूर्ण संस्कृती ही मूल्यहीनतेची शिकवणी आहे. ही केवळ एका मुलीची वैयक्तिक दुर्दैवी घटना नाही, तर ही एका संस्कृतीची अपयशी बिंब आहे—जी केवळ संपत्तीची पूजक आहे, पण स्त्रीत्व, नातं, सहजीवन आणि माणुसकी याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहे.

संपत्तीने बुडवलेली संवेदनशीलता आणि समाजाचे अनुकरण – या नवसंपन्न कुटुंबांनी पैसे कमावले खरे, पण विचार, कष्ट, संघर्ष, समज आणि स्वाभिमान यांसारखी महत्त्वाची मूल्ये सोडून दिली. त्यांच्या मुला-मुलींसमोर आधुनिकतेचा मुखवटा असला तरी आतून ते बौद्धिकदृष्ट्या रिकामे आहेत. त्यांच्यासाठी नात्याचे मोल म्हणजे केवळ व्यवहार, आणि त्यासाठी ते कोणत्याही सीमारेषा ओलांडू शकतात. अशा नवधनाढ्यांच्या यशाच्या मिथकांनी प्रेरित होऊन सामान्य कुटुंबेदेखील त्यांचे अनुकरण करू लागली आहेत. हप्ते, कर्ज, इव्हेंट आधारित विवाह, महागडे फोटोशूट आणि ‘इंस्टाग्रामेबल’ जीवनशैलीचा भाग बनणे हे या अनुकरणाचे परिणाम आहेत. ही संस्कृती केवळ सरंजामीच नाही, तर ती नवसरंजामी आहे—जी धनाढ्यपणासोबत राजकीय आश्रय, हाणामारीची भाषा आणि सामाजिक बेजबाबदारी जोपासते.

विचारांचा ढासळणारा पाया आणि नैतिकतेची गरज –  ही ‘गुंठा संस्कृती’ केवळ शहरी किंवा उपशहरी भागांपुरती मर्यादित नसून, ती गावोगावी पसरत आहे. एकेकाळी शेती, विहीर, पीक, पाण्यावर चर्चा करणारा गाव समाज आज जमीन कितीला गेली आणि कोणत्या दलालाच्या ओळखीने डील झाली, गायगोठा यांच्या पेक्षा गाड्या, कॉन्ट्रॅक्ट, इमारत भाडे यावर चर्चा करतो. यामुळे वैष्णवीसारख्या हजारो मुलींचे आयुष्य केवळ दिखाव्याच्या मृगजळात अडकून संपत चालले आहे. त्या माणूस म्हणून वाढत नाहीत, त्या फक्त ‘ब्रँडेड’ आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत राहतात.

समाज म्हणून आपण आता स्वतःला प्रश्न विचारत काही बदल करायला हवेत. शिक्षण, कष्ट, समाजभान, संवेदनशीलता, नात्यांची बांधीलकी आणि मानवी मूल्ये हीच खरी श्रीमंती आहे. पैसा गरजेचा आहे, पण त्याला माणुसकीचे भान आणि जाण आवश्यक आहे. अन्यथा आपली मुले लहान वयातच दिखाऊ संस्कृतीच्या भोवऱ्यात अडकतील आणि त्यातून कधीच बाहेर येऊ शकणार नाहीत. नात्यांची संवेदनशील वीण उसवली तर कुटुंब संस्कृती बरखास्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. आर्थिक सधनतेने नटलेली पण दिखाव्याच्या झगमगाटात हरवलेली कुटुंबे माणुसकीच्या ओलाव्याला आणि माणूसपणाला महाग होतील. माणूस म्हणून जन्माला आले तरी निष्ठूर व संपत्तीचा हव्यास असलेला लोभी कुटुंब काबीला तयार झाला तर अनेक न सुटणारे प्रश्न निर्माण होतील जे मानवी समाज आणि जीवन मूल्याला आव्हान निर्माण करतील.

वैष्णवीचा मृत्यू ही केवळ एक घटना नसून, ती समाजाच्या नैतिक आत्महत्येची घंटा आहे, जी आपल्याला वेळीच सावध करत असून आपण आर्थिक सधनता, खूप मोठी श्रीमंती म्हणजे नाते नव्हे तर कष्टकरी, नीतिमान, मानवता असलेला, संवेदनशील, सुशिक्षित समाज व्यवस्था आणि कर्ता पुरुष आणि संस्कारी मुलगी हेच कुटुंबाचे वैभव ठरणार आहे.

आज समाज एका विचित्र वळणावर उभा आहे. वैष्णवीचा मृत्यू आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतो. आपण कुठे चाललो आहोत? आपण काय गमावत आहोत? जर आत्ता आपण वळलो नाही, तर उद्या आपल्याजवळ उरतील केवळ बंद दरवाजे, विचार केला नाही तर  माणसं आणि हरवलेली माणुसकी पुन्हा रुजवायला खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

गुंठेवारी व्यवहारांनी जमिनी बदलल्या, पण मनंही विकली गेली. आता गरज आहे पुन्हा आपल्या मुळांकडे वळण्याची. पैसा मिळो, पण नात्यांची उब, संस्कारांची ठेव आणि माणसांतील माणूसपणही टिकून राहो. कोणत्याही सुनेला मरण स्वस्त होऊ नये.

शेतकरी पुत्रांनी नक्कीच उद्योजक व्हायला हवे पण मातीशी, रक्ताच्या नात्यांशी, गावातील जीवलगांशी एकोपा राखत संस्कारांची शिदोरी जपत माणुसकीचा ओलावा हृदयात जिवंत ठेवत प्रगती करायला हवी.सगळ्याच गुंठेवाल्यांनी असे केले नाही पण शेतीच्या शिवारात इमारतींच पीक उगवतय आपुलकी त्या हरवायला नको.प्रगती समाजाला दिशा देणारी असावी घराला घरपण आणि माणसाला शहाणपण देणारी असायला हवी.

( या लेखाचा उद्देश केवळ सामाजिक जागरूकता आणणे असा निखळ हेतू असून जाणवलेली सामाजिक पोकळी मांडण्याचा प्रयत्न आहे.) क्रमशः भाग १ – भाग २ लवकरच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!