कोरेगाव भीमा येथील ३ मुलांचे अपहरण करून ७ वर्षीय मुलीचा खून करणारा आरोपी जेरबंद

Swarajyatimesnews

स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी केले जेरबंद 

दिनांक ११ मार्च , कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यापैकी एका ७ वर्षीय मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.याप्रकरणी मुलीची आई बिनादेवी रंजित रविदास (वय ३४, रा. आदित्य पार्क सोसायटी, कोरेगाव भिमा ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी, आपल्याकडील ७ वर्षीय मुली गायत्री रंजित रविदासचा फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती. 

सदर प्रकरणी बबन रामफेर यादव (वय ४४ वर्ष, रा. कोरेगाव भिमा, कल्याणी फाटा, ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. अहिरावल दरखा, अमेठी, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर गायत्री रंजित रविदास (वय ७ वर्ष) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारीला फिर्यादी यांच्या ७ वर्षीय मुलीला ज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सदरचा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देखमुख यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांना दिल्या होत्या.

पोलीस पथक शोध घेत असताना परिसरातील इतर दोन लहान मुले ही शिक्रापूर-चाकण रोडवरील बहुळ या गावाजवळ मिळून आली. त्याआधारे आणखी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी एक इसम अपहरण झालेली मुलगी गायत्री व बहुळ येथे मिळून आलेली दोन मुले यांना त्याच्याकडील मोटार सायकलवरून शिक्रापूर ते चाकण बाजूकडे जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले. सदर इसमाची ओळख पटवून तो फिर्यादी राहत असलेल्या परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

आरोपी बबन रामफेर यादव ताब्यात घेवून  त्याच्याकडे चौकशी केली असता तिनही मुलांचे अपहरण केल्याची कबुली दिली. तसेच शिक्रापूर-चाकण रोडने घेवून जाताना रोडलगत असणारे विहीरीमध्ये गायत्री रविदास हिस टाकून देवून तिचा खून केला असल्याचे सांगितले. व इतर दोन मुलांना बहुळ येथे सोडून दिल्याची माहिती दिली.

दरम्यान, आरोपीचे मदतीने गायत्रीचा शोध घेतला असता, बहुळ गावाजवळील रोडलगत असणारे विहीरीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला आहे. तर आरोपी बबन यादव हा सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदिप साळुंखे करीत आहेत.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, शिक्रापर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप साळुंखे रोहीणी सोनावळे,पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सोमनाथ कचरे, मस्कर, जितेंद्र पानसरे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, सागर धुमाळ, पोलीस अंमलदार विरण्णा मुत्तनवार, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, रोहीदास पारखे, विकास पाटील, जयराज देवकर, शिवाजी चितारे, यांनी केली असून पुढील तपास शिक्रापुर पोलीस स्टेशन करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!