पुणे, २७ मे २०२५ – महापुरुषांच्या यशात त्यांच्या सहचरणींचे योगदान महत्त्वाचे असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनावर “रमाई संशोधन प्रकल्पा”द्वारे बार्टी संस्था प्रकाश टाकणार आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली.
बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था), पुणे येथे रमाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी रमाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
महासंचालक वारे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व हिमालयासारखे होते. त्यामागे रमाई यांचा मोठा त्याग व संघर्ष आहे. त्यांच्या जीवनातील आठवणी ज. वि. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्पात जतन केल्या जातील.”
कार्यक्रमानंतर वाडिया महाविद्यालयाजवळील रमाई स्मारकात रमाईच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष विठ्ठलदादा गायकवाड, माजी उपमहापौर सुनिताताई वाडेकर, नगरसेविका लता राजगुरू, परशुराम वाडेकर यांच्या हस्ते महासंचालक वारे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात निबंधक इंदिरा अस्वार, विभागप्रमुख स्नेहल भोषले, उमेश सोनवणे, अनिल कांरडे, दादासाहेब गिते आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामदास लोखंडे यांनी केले तर आभार वैशाली खांडेकर यांनी मानले.