धक्कादायक! पुणे-नगर हायवेवरील लॉजिंगमध्ये सेक्स रॅकेट उध्वस्त, ३ बांगलादेशी महिलांसह ७ जणींची सुटका!

Swarajyatinesnews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा 

पुणे-नगर हायवेवर कारेगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत सुरू असलेल्या एका लॉजिंगवरील  सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस आणि दहशतवाद विरोधी शाखेने (ATS) संयुक्तपणे टाकलेल्या या धडक छाप्यात वेश्या व्यवसायातून तब्बल ७ महिलांची सुटका करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी ३ महिला या बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले असून, या कारवाईमुळे शिरूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याचा मुख्य साथीदार फरार झाला आहे.

लुतफ्फर मुज्जमलहक शेख (वय ४५, मूळ रा. हुगळी, पश्चिम बंगाल, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार बबलू साहू (सध्या रा. कारेगाव, मूळ रा. ओडिशा) हा पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला असून पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) भूषण माने यांना कारेगाव हद्दीतील नगर-पुणे हायवे रोडला लागून असलेल्या ‘जयश्री फर्निचर’च्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये परदेशी महिलांकडून बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या नेतृत्वाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलीस आणि दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकला. अटक करण्यात आलेला आरोपी लुतफ्फर शेख आणि फरार बबलू साहू हे दोघे संगनमताने परराज्यातील आणि परदेशातील महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत होते. त्यांना पैशांचे आमिष दाखवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्याकडून बळजबरीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेल्या सर्व ७ पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली असून, त्यांची रवानगी मुंढवा (पुणे) येथील महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांमधील ३ बांगलादेशी महिलांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना पुन्हा बांगलादेशात (डिपोर्ट) पाठवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या छाप्यात फरार झालेला आरोपी बबलू साहू हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी देखील अशाच प्रकारे वेश्याव्यवसाय चालवल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

सदरची धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संतोष औटी, विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, विजय सरजिने, संदीप जगदाळे, संतोष साळुंखे, अमोल रासकर, किशोर शिवणकर, योगेश गुंड, महिला पोलीस अंमलदार विद्या बनकर, मोहिनी पाटील, शुभांगी लबडे, सोनाली जगताप तसेच दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक फौजदार महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, ओंकार शिंदे, मोसीन शेख आणि गणेश चंदनशिव यांनी सहभाग घेतला. या  सेक्स रॅकेट प्रकरणाचा पुढील तपास  पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक थोरात करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!