दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तुले जप्त!

Swarajyatimesnews

128.3 ग्रॅम मेफेड्रोन, तीन गावठी पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे जप्त; एमडी विक्री व पुरवठा साखळीतील सात आरोपींना अटक, 23.27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

उदयकांत ब्राम्हणे

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांची विक्री आणि अवैध शस्त्रांच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोणी-कंद पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाच्या विक्री व पुरवठा साखळीचा पर्दाफाश करत सात आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 128.3 ग्रॅम एमडी ड्रग्ज, तीन देशी बनावटीची पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे, तीन मोटारी आणि दोन मोबाइल फोन असा एकूण 23 लाख 27 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे आणि अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस उपायुक्त परिमंडळ सातचे उपायुक्त अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी-कंद पोलिसांनी तपास सुरू केला.

गुप्त माहितीवरून पहिली कारवाई – 29 ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंगदरम्यान पोलिस अंमलदार शुभम चिनके आणि सुधीर शिवले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कातकेवाडी फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी इसम ऊर्फ सोन्या दत्तात्रय होळे (वय 35, रा. लोणीकंद, ता. हवेली) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 19.4 ग्रॅम एमडी ड्रग्ज, एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, मोबाइल फोन आणि टाटा सफारी मोटार असा नऊ लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पिस्तुलांसह दोघे ताब्यात – त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी पुढील तपासात विशाल शिवाजी माकर (वय 26, रा. ढोकसांगवी, ता. शिरूर) आणि सोमनाथ संजय गोरे (वय 24, रा. न्हावलेनगर, हडपसर) यांना खंडोबामाळ, लोणीकंद परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे असा 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तांत्रिक विश्लेषणातून आणखी चौघांचा शोध – अटक आरोपींकडे केलेल्या तपासातून आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी 3 नोव्हेंबर रोजी आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये विशाल ऊर्फ दादा रामदास कोलते (वय 34), राजुराम उमेदराम चंवले (वय 34), वैभव बाळू खेडकर (वय 28) आणि शिवम प्रशांत देडगे (वय 21) यांचा समावेश आहे.

जुन्या टोलनाका, पेरणे परिसरात ही कारवाई करण्यात आली. या आरोपींकडून 108.9 ग्रॅम एमडी ड्रग्ज, दोन स्विफ्ट मोटारी आणि आरोपींच्या वापरातील मोबाइल फोन असा 13 लाख 36 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुरवठा साखळीचा तपास सुरू – या प्रकरणात एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एमडी ड्रग्जचा पुरवठा करणारे आणि वितरण साखळीतील इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. गुन्हेगारी नेटवर्कमधील फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज शोधून संबंधित व्यक्ती, घटक आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू आहे.

लोणीकंद पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कागणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!