वढू बुद्रुकमध्ये हातभट्टीवर पोलिसांचा छापा; एक हजार लिटर रसायन जप्त

Swarajyatimesnews

पोलिसांची चाहूल लागताच संशयित उसाच्या शेतात पसार; ३० हजारांचा मुद्देमाल

शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे अवैध गावठी दारू निर्मितीचा प्रकार उघडकीस आला आहे. म्हाळण ओढ्याजवळ काटेरी झुडपांच्या आड सुरू असलेल्या कथित हातभट्टीवर शिरूर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे एक हजार लिटर कच्चे रसायन आढळले असून, त्याची किंमत ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादी जबाबात नमूद आहे. पोलिसांची चाहूल लागताच हातभट्टी चालवित असल्याचा आरोप असलेला बजरंग बजेसिंग नानावत उसाच्या शेतात पळून गेला.

२६ ऑक्टोबर रोजी दुपारी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले यांच्या पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी मोठ्या भांड्यात रसायन टाकून गावठी दारू तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांना दिसले. पथकाला पाहताच संबंधित व्यक्ती ओढा ओलांडून शेजारच्या उसाच्या शेतात पसार झाली.

घटनास्थळी रसायन साठवण्यासाठी वापरलेले ड्रम, लोखंडी भांडे आणि अन्य साहित्य आढळले. रसायनाचा नमुना घेऊन उर्वरित रसायन व संबंधित साहित्याचा पंचांसमक्ष नाश केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या  प्रकरणी पोलीस हवालदार विकास रामचंद्र सरोदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. बजरंग बजेसिंग नानावत (रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध बेकायदा गावठी हातभट्टी चालविणे आणि मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकणाऱ्या रसायनांचा वापर केल्याच्या आरोपांबाबत कायदेशीर कारवाईचा उल्लेख फिर्यादीत आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलिस हेमंत कुंजीर, पोलिस पाटील जयसिंग भंडारे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

अवैध दारू निर्मितीला आळा घालण्याचे आव्हान –गावठी दारू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारांवर सातत्याने लक्ष ठेवून अवैध दारू निर्मितीला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. वढू बुद्रुकमधील या कारवाईनंतर परिसरात अशा प्रकारचे आणखी अड्डे आहेत का, याचीही तपासणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!