आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या माध्यमातून कोरेगाव भीमा–पेरणे बंधाऱ्याच्या दुरुस्तीला गती!

Swarajyatimesnews

आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या माध्यमातून पाठपुरावा; पावसाळ्यापूर्वी काम सुरू होण्याची शक्यता

कोरेगाव भीमा (ता. शिरूर ) : गतपावसाळ्यात भीमा नदीला आलेल्या पुरामुळे कोरेगाव भीमा–पेरणे दरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची संरक्षक भिंत वाहून गेल्याने शेती, पाणी योजना आणि परिसरातील भविष्यातील पाण्याच्या गरजांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळाली असून, पावसाळ्यापूर्वी प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.

सुमारे ३७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याची संरक्षक भिंत गेल्या पावसाळ्यात वाहून गेल्याने परिसरातील मोठ्या क्षेत्रातील शेती बाधित झाली होती. कोरेगाव भीमा, पेरणे, डोंगरगावसह परिसरातील अनेक गावांच्या पाणी योजनांसाठी हा बंधारा महत्त्वाचा आहे. त्यामुळे दुरुस्तीला आणखी विलंब झाल्यास आगामी काळात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

१७८३ हेक्टर शेतीचा पाण्याचा आधार – १९८५ मध्ये बांधकाम सुरू होऊन १९८८ मध्ये पूर्ण झालेल्या या बंधाऱ्यावर भीमा नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरील १,७८३ हेक्टर म्हणजेच सुमारे ४,४५७ एकर शेती ओलिताखाली येत होती. त्यामुळे बंधाऱ्याची संरक्षक भिंत वाहून जाणे हा केवळ एका बांधकामाचा प्रश्न नसून परिसरातील शेतीच्या पाण्याशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे.

गतवर्षी बंधारा बाधित झाल्याने सुमारे दीड ते दोन हजार हेक्टर शेतीला फटका बसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता बंधाऱ्याची दुरुस्ती करून पाणीसाठा सुरक्षित करण्याबरोबरच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

नागरीकरण, उद्योग आणि पाणी योजनांनाही आधार – कोरेगाव भीमा आणि पेरणे परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. परिसरातील उद्योगधंदे तसेच आजूबाजूच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठीही या बंधाऱ्याच्या पाण्याचे महत्त्व आहे. त्यामुळे बंधाऱ्याची दुरुस्ती वेळेत न झाल्यास भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

वर्क ऑर्डरनंतर प्रत्यक्ष कामाची प्रतीक्षा – बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली असून, पावसाळ्यात नदीपात्रातील काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शक्य तितक्या लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. सहाय्यक अभियंता अश्विन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित यंत्रणेकडून कामाची प्रक्रिया पुढे नेली जात आहे.

या वेळी  दशरथ वाळके, संपतराव गव्हाणे, सुनील सव्वाशे, दीपक वाळके,  तानाजी ढेरंगे व  पाटबंधारे विभागाचे कर्मचारी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

दुरुस्ती वेळेत होण्याची ग्रामस्थांची अपेक्षा – बंधाऱ्याची दुरुस्ती केवळ संरक्षक भिंतीपुरती मर्यादित न राहता भविष्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि वाढत्या नागरीकरणाच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार पद्धतीने व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यापूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन ते वेळेत पूर्ण झाल्यास आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचा धोका कमी होण्यास मदत होईल, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

शेतीसह भविष्यातील पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ – “कोरेगाव भीमा–पेरणे बंधारा हा केवळ शेतीसाठी नाही, तर परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि वाढत्या नागरीकरणासाठीही महत्त्वाचा आहे. बंधारा बाधित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होऊन वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. आमदार माऊली कटके यांच्या माध्यमातून या प्रश्नासाठी पाठपुरावा सुरू असून, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची ग्रामस्थांना अपेक्षा आहे.” — संपतराव गव्हाणे, ग्रामस्थ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!