सामान्य शाळांचा ‘जागतिक’ झेपेचा संकल्प! पाबळ-केंदूर गटात ‘मिशन-५३’

Swarajyatimesnews

५३ जिल्हा परिषद शाळांचा तीन महिन्यांत कायापालट; १४७ शिक्षकांना प्रशिक्षण

 उदयकांत ब्राम्हणे

पाबळ-केंदूर गटातील ५३ जिल्हा परिषद शाळांचा सामान्य शाळांपासून आधुनिक व जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रांकडे प्रवास घडवून आणण्यासाठी ‘मिशन-५३’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला सुरुवात झाली आहे. अवघ्या तीन महिन्यांत शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जालिंदरनगर (ता. खेड) येथे या उपक्रमातील पहिल्या शिक्षक प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून, गटातील १४७ शिक्षकांना विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमात केवळ शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा न करता शिक्षणपद्धतीतही व्यापक बदल करण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजीसह जपानी, फ्रेंच आणि जर्मन या परदेशी भाषांचे शिक्षण, रोबोटिक्स व कोडिंग, आर्थिक साक्षरता, योग, ध्यानधारणा, आत्मसंरक्षण, संगीत आणि आधुनिक डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

प्रत्येक शाळेत डिजिटल पॅनेल, स्वतंत्र ग्रंथालय, संगीत साहित्य, रोबोटिक्स व कोडिंगची सुविधा निर्माण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी लाठी-काठी, कराटे यांसह एकूण २१ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर Indian Knowledge System अर्थात भारतीय ज्ञान प्रणाली सुरू करून भारतीय परंपरा, ज्ञान, संस्कृती आणि आधुनिक शिक्षण यांचा समन्वय साधला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष शिक्षण मिळावे यासाठी प्रफुल्ल शिवले यांनी स्वतःच्या पदरखर्चातून प्रत्येक शाळेला रोबोटिक्स किट उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

शाळांच्या भौतिक सुविधांमध्येही सुधारणा करण्याचे नियोजन असून, चांगली स्वच्छतागृहे, सुरक्षित वर्गखोल्या आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. लोकसहभागातून ५२ शाळांना एकाच प्रमाणित स्वरूपात रंगरंगोटी करून आकर्षक रूप देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. ‘मिशन-५३’ अंतर्गत चार केंद्रांचा एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार असून, केंद्रप्रमुखांसाठी डॅशबोर्ड, डिजिटल स्वाक्षरी आणि ऑटोमेटेड ई-मेल प्रणाली विकसित केली जाणार आहे. शाळांच्या कामकाजाची माहिती वर्षातून चार वेळा अद्ययावत केली जाणार असून, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्याचेही नियोजन आहे.

सर्व सहभागी शाळांमध्ये सौरऊर्जा, वाय-फाय इंटरनेट आणि इंटरॅक्टिव्ह पॅनेल यांसारख्या सुविधांवरही भर दिला जाणार आहे. शिक्षकांचा प्रशासकीय कामांमध्ये जाणारा वेळ कमी करून तो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी वापरण्याचा प्रयत्न आहे. आठवड्याला उपलब्ध असलेल्या ४० तासांपैकी मोठा वेळ इतर कामांमध्ये जात असल्याने, या उपक्रमातून सुमारे २५ तास वाचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.

आशुतोष वाघ यांनी जानेवारीपर्यंत निश्चित केलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. यापूर्वी ७०९ शाळांसोबत काम सुरू असून, पाबळ-केंदूर गटातील ५३ शाळांना एकत्रितपणे ‘एक बेट’ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमासाठी १८ जणांची टीम कार्यरत करण्यात आली असून, शाळांच्या विकासासाठी लोकसहभागाला महत्त्व देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विविध भाषांचे ज्ञान, आर्थिक व्यवहाराचे भान, तंत्रज्ञानाची ओळख, आत्मसंरक्षण, भारतीय ज्ञानपरंपरा आणि जागतिक स्तरावरील कौशल्ये मिळावीत, हा ‘मिशन-५३’चा प्रमुख उद्देश आहे. पाबळ-केंदूर गटाला राज्यातील आदर्श शैक्षणिक गट बनविण्याचे उद्दिष्ट यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!