शिक्रापूर-शिरूरमधील तीन घरफोड्या उघड; १६ तोळे सोन्यासह दुचाकी जप्त
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
शिक्रापूर : महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून अटक केली. दीपक भीमराव दांडे (वय २५, रा. घुगरी, ता. भैंसदेही, जि. बैतूल, मध्य प्रदेश; सध्या रा. कविठा, ता. अचलपूर, जि. अमरावती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १६ तोळे सोन्याचे दागिने, दुचाकीसह एकूण २४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शिक्रापूर आणि परिसरातील घरफोडीच्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळे, गुन्ह्याची वेळ, आरोपीची कार्यपद्धती, सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील कविठा येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने शिक्रापूर आणि शिरूर परिसरात घरफोड्या केल्याची माहिती दिली. त्यातून शिक्रापूरमधील दोन आणि शिरूरमधील एका अशा तीन घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. या प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिते नुसार कारवाई करण्यात आली आहे.
तपासादरम्यान आरोपीकडून चोरीचे सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा सुमारे २४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात यापूर्वी एकूण १४ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून तो सध्या शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, विभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व त्यांच्या पथकाने केली.
