पहाटे गोठ्याबाहेर झोपलेल्या भाग्यश्री वारे हिच्यावर बिबट्याची झडप; शोधमोहीमेसाठी पिंजरे, ड्रोन आणि कॅमेरा ट्रॅप तैनात
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी परिसरात बुधवारी (२२ जुलै) पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत मुलीचे नाव भाग्यश्री संदीप वारे (वय ५) असून ती ऊसतोड कामगाराची मुलगी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री ही मूळची पाथर्डी (जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी होती. सध्या ती आई-वडिलांसह पिंपळसुटी येथील शेतकरी मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या शेतात ऊसतोड कामासाठी वास्तव्यास होती. बुधवारी पहाटे सुमारे २.४५ वाजता आई-वडील आणि भाग्यश्री गोठ्याबाहेर झोपलेले असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक चिमुकलीवर झडप घातली.
हल्ला होताच भाग्यश्रीने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आई-वडील जागे झाले आणि त्यांनी बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणार्धात बिबट्याने भाग्यश्रीला ऊसाच्या दाट शेतात ओढून नेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर ऊसाच्या शेतात भाग्यश्रीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली.
घटनेची माहिती मिळताच जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक उपवनसंरक्षक राजहंस आणि वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शासनाच्या नियमानुसार मृत मुलीच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
घटनेनंतर वन विभागाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. परिसरात पिंजरे लावणे, कॅमेरा ट्रॅप बसविणे, ड्रोनद्वारे पाहणी करणे आणि रात्रगस्त वाढविणे अशा उपाययोजना युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये, लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे तसेच बिबट्याचे दर्शन झाल्यास वन विभागाच्या १८०० ३०३३ या हेल्पलाईनवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
भीतीचे सावट; ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप – पिंपळसुटीसह परिसरात बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकरी, ऊसतोड कामगार आणि ग्रामस्थ भयभीत झाले असून, लहान मुलांना घराबाहेर सोडण्यास पालक धजावत नाहीत. रात्रीच्या वेळी शेतात जाणेही धोकादायक बनले आहे.
ग्रामस्थांनी वन विभागावर नाराजी व्यक्त करत बिबट्याला तातडीने जेरबंद करावे, अधिक पिंजरे लावावेत, रात्रगस्त वाढवावी आणि पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
ऊसपट्ट्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज – शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्यांचा वावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ घटना घडल्यानंतरची कारवाई न करता वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती, नियमित गस्त, धोकादायक भागांचे सर्वेक्षण आणि बिबट्यांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. भाग्यश्रीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
