कोरेगाव भीमा आठवडा बाजारात शिक्रापूर पोलिसांकडून दोन सराईत चोरटे रंगेहात जेरबंद

Swarajyatimesnews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा 

कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारात नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी रंगेहात पकडत त्यांचा डाव उधळून लावला आहे. बाजार परिसरात सुरू असलेल्या पोलिसांच्या पायी पेट्रोलिंगमुळे ही मोठी कारवाई यशस्वी झाली असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारात मोठी गर्दी झाली होती.

यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेवरून पोलीस हवालदार श्रवण गुपचे, नवनाथ नाईकडे आणि गणेश कुदळे हे बाजार परिसरात पायी पेट्रोलिंग करत होते. यावेळी दोन संशयित इसम बाजारातील नागरिकांच्या गर्दीत चोरी करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ सतर्कता दाखवत त्यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्यांनी आपली नावे जावेद अजिज सय्यद व लुकमान सुलेमान सय्यद (दोघेही रा. मदिरा मोहल्ला, शिरूर) अशी सांगितली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.

प्राथमिक तपासात या दोन्ही आरोपींवर यापूर्वीही रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीसह विविध गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून हे दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलीस हवालदार श्रवण गुपचे, नवनाथ नाईकडे, गणेश कुदळे आणि पोलीस हवालदार इंगवले यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार अजित इंगवले करत आहेत.

आठवडा बाजारांवर पोलिसांची करडी  नजर!-“गेल्या महिनाभरापासून शिक्रापूर, तळेगाव आणि कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारांमध्ये नियमित पायी पेट्रोलिंग सुरू आहे. यापूर्वी शिक्रापूर बाजारात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता कोरेगाव भीमा बाजारात आणखी दोन चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. नागरिकांनीही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.”- पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, , शिक्रापूर पोलिस स्टेशन

गर्दीचा फायदा घेणारे सराईत जाळ्यात  – अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत. बाजारातील महिलांचे दागिने, मोबाईल आणि पाकिटे लांबवण्याचा त्यांचा उद्देश होता, मात्र शिक्रापूर पोलिसांच्या साध्या वेशातील आणि पायी गस्तीमुळे गुन्हेगारांचा हा मनसुबा वेळेतच उधळला गेला.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन – आठवडा बाजाराच्या दिवशी ग्रामीण भागातून शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. अशा वेळी मौल्यवान वस्तू, दागिने आणि पैशांची पाकिटे सांभाळणे आवश्यक आहे. पोलिसांची गस्त सुरू असली तरी नागरिकांनी स्वतःहून जागरूक राहणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!