पाबळ ग्रामीण रुग्णालयात महिनाभरात सर्व सुविधा उपलब्ध होणार; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एमपल्ले यांचे आश्वासन

Swarajyatimesnews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा

पाबळ (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयातील बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही आणि बाळंत विभाग येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल. तसेच, पुढील एका महिन्यात शवविच्छेदन (Post-Mortem) सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ एमपल्ले यांनी दिली आहे.

पाबळ रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत डॉ. एमपल्ले यांनी शुक्रवारी (ता. २९) रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांनी गेल्या चार वर्षांतील रुग्णालयाचा सावळागोंधळ आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा ग्रामस्थांच्या उपस्थितीत आक्रमकपणे मांडला.

पाहणी दरम्यान रुग्णालयातील पाणीपुरवठा यंत्रणाही बंद असल्याचे समोर आले. यावर तातडीने उपाययोजना करताना डॉ. एमपल्ले यांनी एमव्हीजी कंत्राटातील वादग्रस्त कर्मचारी हटवणे, सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करणे आणि बंद पडलेला बाळंत विभाग सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी रुग्णालयाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वखर्चाने दुरुस्ती करून देण्याचे शिवले यांनी जाहीर केले. या प्रसंगी वढूचे माजी सरपंच अंकुश शिवले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुग्णालय पटांगणात चक्क लग्नकार्य; कर्मचाऱ्यांकडून क्वार्टर्सचे व्यावसायिकरण! – रुग्णालयातील ढासळलेली परिस्थिती आणि अनागोंदी कारभार पाहून अधिकारीही अवाक झाले. रुग्णालयातील दोन कर्मचारी आपली शासकीय निवासस्थाने परस्पर भाड्याने देत होते, तसेच त्यांचा वापर लॉजसारखा होत असल्याचा खळबळजनक पुरावा प्रफुल्ल शिवले यांनी यावेळी दिला.

इतकेच नव्हे तर, रुग्णालय परिसरात चोहोबाजूला दारू आणि बिअरच्या बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळाला. कहर म्हणजे, काही महिन्यांपूर्वी रुग्णालयाच्या अधिकृत पटांगणात चक्क एक मोठे लग्नकार्य पार पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारांमुळे पाबळ ग्रामीण रुग्णालयाच्या सुरक्षेचा आणि प्रशासनाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!