रांजणगाव येथे बनावट सोने गहाण ठेवून HDFC बँकेला १७ लाख ७६ हजारांचा गंडा

Swarajyatimesnews

रांजणगाव पोलिसांकडून दोघांना अटक, १२ जणांवर गुन्हा दाखल

रांजणगाव (ता.शिरूर): खरे सोने असल्याचे भासवून बँकेत बनावट सोने गहाण ठेवून HDFC बँकेची तब्बल १७ लाख ७६ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव येथे उघडकीस आला आहे. बँकेच्याच अधिकृत सोने पारखणाऱ्याला (गोल्ड व्हॅल्यूअर) हाताशी धरून हा मोठा डल्ला मारण्यात आला असून, या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

बँकेचे प्रतिनिधी शैलेश लालासाहेब जाधव (रा. शुक्रवार पेठ, पुणे)  यांनी या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर, मच्छिंद्र दिगंबर खैरनार, प्रतीक दादा मांडगे, किरण हौसराव सुरवसे, ऋषिकेश मधुकर देशमुख, तन्मय नानासाहेब जगदाळे, दीपक नाना बोराडे, बाजीराव सिताराम शेळके, अभिषेक यशवंत जोंधळे, मयूर रंगनाथ लंघे, संजय हिराचंद पंडित आणि प्रवीण गवळी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

हा सर्व फसवणुकीचा प्रकार गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत रांजणगाव येथील HDFC बँकेच्या शाखेत घडला. मुख्य आरोपी लक्ष्मण वीर याच्या सांगण्यावरून इतर साथीदारांनी बँकेत बनावट सोने आणले आणि ते खरे असल्याचे भासवून त्यावर ‘गोल्ड लोन’ म्हणजेच सुवर्ण कर्ज लाटले. या संपूर्ण प्रकरणात बँकेने नेमलेला सोने पारखणारा संजय हिराचंद पंडित हा देखील सामील होता. सदरचे सोने बनावट आहे हे पूर्णपणे माहीत असतानाही त्याने ते खरे असल्याचे खोटे प्रमाणपत्र बँकेला दिले. या संगनमताने आरोपींनी बँकेला लाखो रुपयांचा आर्थिक चुना लावला.

फसवणुकीचा हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून २५ मे रोजी रात्री मुख्य आरोपी लक्ष्मण वीर आणि मच्छिंद्र खैरनार या दोघांना अटक केली. न्यायालयाने आरोपी लक्ष्मण वीर याला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, मच्छिंद्र खैरनार याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. एस. वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तिडके आणि पोलीस हवालदार चव्हाण या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!