पेरणे फाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभालगतच्या दलित वस्ती आणि झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कचरा डेपोप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अखेर गंभीर दखल घेत धडक कारवाई केली आहे. हवेली-खेड तालुका क्षेत्र अधिकारी रेखा तोगरे यांनी घटनास्थळी पाहणी करून भिमा नदीकिनारी कचरा टाकण्यास तात्काळ मज्जाव केला असून नागरिकांच्या आरोग्याला आणि भिमा नदीच्या स्वच्छतेला प्राधान्य देत सदर कचरा डेपो तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. तसेच संबंधित गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्समध्ये या गंभीर प्रकाराचे वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. पेरणे फाटा परिसरात रात्री-अपरात्री वाहनांमधून व्यावसायिक व रासायनिक कचरा आणून टाकला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. हा कचरा खुलेआम जाळला जात असल्याने परिसरात विषारी धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे दलित वस्तीतील लहान मुले, महिला, वृद्ध नागरिक तसेच ऐतिहासिक विजयस्तंभाला भेट देणाऱ्या अनुयायांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात होती.
या प्रकरणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते समाधान बबन माने यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयात पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली होती. स्थानिक लोणीकंद पोलिस ठाणे आणि पेरणे ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कचरा माफियांचे धाडस वाढल्याचा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला होता.
तक्रारीची गंभीर दखल घेत क्षेत्र अधिकारी रेखा तोगरे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. भिमा नदीच्या पात्रालगत कोणतीही वैध परवानगी न घेता कचरा डेपो उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच कचऱ्याची अयोग्य पद्धतीने साठवण व विल्हेवाट लावली जात असल्याने परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचेही स्पष्ट झाले.

घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ नुसार, नदीपात्र, पूरप्रवण क्षेत्र आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांमध्ये कचरा डेपो उभारणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करत अधिकाऱ्यांनी संबंधितांना तातडीने सुधारात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून सदर कचरा डेपो तात्पुरता बंद करण्यात आला असून पुढील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास पुणे-नगर महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी कायम ठेवली आहे.
यावेळी पेरणे ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी दादाभाऊ नाथ, ग्राम पंचायत सदस्या मंगल निलेश वामणे, सामाजिक कार्यकर्ते समाधान माने, संजय फासगे, अमोल म्हस्के, सचिन डाके यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
“घनकचरा प्रकल्प पूरप्रवण क्षेत्रामध्ये उभारता येणार नाही. भिमा नदीच्या पात्रालगत कोणतीही वैध मान्यता न घेता कचरा डेपो उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. कचऱ्याची अयोग्य साठवण व विल्हेवाट यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ नुसार संबंधित गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून आवश्यक त्या सुधारात्मक उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश दिले जातील. पर्यावरण व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सदर कचरा डेपो तात्पुरता बंद करण्यात आला आहे.”— रेखा तोगरे, क्षेत्र अधिकारी, हवेली-खेड तालुका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
