स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
निसर्ग संवर्धन आणि वाचन संस्कृतीची सांगड घालत शिक्रापूर येथे “चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा” उपक्रम आणि जागतिक पुस्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय व ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अभिनव उपक्रमाचे यंदा सलग सहावे वर्ष होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच रमेश गडदे आणि निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाद्वारे चिमण्यांचे संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखणे आणि पुस्तकांच्या माध्यमातून वैचारिक प्रगल्भता जोपासणे असा दुहेरी संदेश देण्यात आला.
जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून वाचनालयाचे सभासद आणि युवा लेखक प्रथमेश विश्वास यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रथमेश यांनी वाचनालयाला पुस्तक भेट देऊन युवकांना वाचनाची आवड जोपासण्याचे आवाहन केले. ग्रंथपाल संतोष काळे पाटील यांनी गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम सलगपणे यशस्वी होत असल्याचे सांगत उपस्थितांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला आदर्श ग्रंथपाल संतोष काळे पाटील, लेखक प्रथमेश विश्वास, सामाजिक कार्यकर्ते बबन मांढरे पाटील, ह.भ.प. चंद्रकांत खेडकर, उद्योजक जितेंद्र काळोखे, प्रशांत वाबळे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अनंता दरवडे यांसह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. निसर्ग आणि साहित्याची सेवा करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात आले. संतोष काळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
