सलाम माणुसकीला! शिरूरमध्ये रस्त्यात प्रसूती होणाऱ्या महिलेसाठी डॉक्टर, नगरसेविका अन पत्रकार बनले देवदूत

Swarajyatimesnews

शिरूर येथील जोशीवाडी परिसरातील एक गर्भवती महिला प्रसूती कळा सुरू झाल्याने आपल्या पतीसोबत ग्रामीण रुग्णालयाकडे पायी चालली होती. मात्र, निर्माण प्लाझा जवळ येताच तिला वेदना असह्य झाल्या आणि ती रस्त्यातच बसली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पत्रकार सुदर्शन दरेकर यांनी तत्काळ डॉ. संतोष पोटे यांना संपर्क साधला. काही वेळातच डॉ. सुनिता पोटे आणि नगरसेविका पूजा पोटावळे घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांनी प्रसंगावधान राखत आपल्या तोंडाचे स्कार्फ आणि शेजारील पडवळ कुटुंबाकडून साड्या घेऊन त्या मातेभोवती आडोसा तयार केला. या कठीण प्रसंगात स्थानिक रिक्षाचालक आणि मेडिकल स्टोअर मालकांनीही मदतीचा हात पुढे केला.बाळाचा जन्म झाला खरा, पण ते रडत नव्हते, ज्यामुळे उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, डॉ. सुनिता पोटे यांनी आपल्या वैद्यकीय कौशल्याने त्या नवजात बालकाला रडते केले.

डॉ. पोटे यांनी जेव्हा त्या गोंडस बाळाला उंचावून सर्वांना दाखवले, तेव्हा परिसरात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर आई आणि बाळाला तातडीने डॉ. पोटे यांच्या मिरा नर्सिंग होम येथे हलवण्यात आले. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. सुनिता पोटे यांनी दिली.”अडचणीच्या काळात एका गरीब मातेच्या मदतीला सर्वजण धावून आले, हा आनंद सर्वोच्च आहे,” अशा भावना डॉ. पोटे यांनी व्यक्त केल्या. जात-पात आणि उच्च-नीच असा कोणताही भेदभाव न ठेवता शिरूरकरांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आज एका गरिबाच्या संसारातील दिवा सुरक्षित राहिला असून, या माणुसकीच्या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हा देश सर्व जाती-धर्माचा आहे, इथे उच्च-नीच पाहिले जात नाही. अडचणीच्या काळात एका गरीब मातेच्या मदतीला सर्वजण धावून आले. त्या गोंडस बाळाचा जन्म झाल्यानंतर आम्हाला जो आनंद झाला, तो सर्वोच्च आहे.” — डॉ. सुनिता पोटे (नगरसेविका व संचालिका, मिरा नर्सिंग होम, शिरूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!