प्रशासनात ‘शिवशाही’चा वारसा; सामान्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Swarajyatimesnews

लोणीकंद येथे ‘समाधान शिबिरा’चे दिमाखदार उद्घाटन; मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत-२०४७’ च्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन खंबीर पावले उचलत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक प्रशासनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रगतीचा प्रकाश पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

लोणीकंद (ता. हवेली) येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’अंतर्गत आयोजित भव्य ‘समाधान शिबिरा’चे उद्घाटन मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

महसूल विभागाचा चेहरामोहरा बदलणार – आपल्या भाषणात बावनकुळे यांनी महसूल विभागातील क्रांतिकारक बदलांची माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांत या अभियानाद्वारे राज्यातील ५ लाख कुटुंबांच्या उंबरठ्यापर्यंत शासकीय सेवा पोहोचल्या आहेत. पुणे जिल्ह्यात १३ हजारांहून अधिक दाखल्यांचे वितरण झाले असून हे कार्य छत्रपती शिवरायांच्या नावाला साजेसे असल्याचे त्यांनी नमूद केले. “राज्यात एकही नागरिक बेघर राहणार नाही, या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून शेतजमीन अकृषक (NA) करण्याची प्रक्रिया आता अत्यंत सुलभ केली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी आणि ग्रामीण विकासावर भर – ग्रामीण भागाच्या विकासासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना’ मैलाचा दगड ठरणार असून येत्या ५ वर्षात सर्व शेत रस्ते पूर्ण केले जातील, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली. हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींनी घेतलेल्या विशेष ग्रामसभेच्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. तसेच, देवस्थानच्या इनाम जमिनींबाबत आगामी अधिवेशनात विशेष कायदा करण्याचे सूतोवाच करत, भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या सातबाऱ्यावरील शेरे कमी करण्याबाबत लवकरच पुनर्वसन मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

प्रशासकीय सक्षमीकरण आणि आधुनिकता – प्रशासकीय कामे अधिक वेगवान व्हावीत यासाठी यावेळी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना मंत्र्यांच्या हस्ते लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. तसेच महसूल सेवांची माहिती देणाऱ्या ‘क्यूआर कोड’चे अनावरण करण्यात आले. नागपूरच्या धर्तीवर पुणे विभागातही महिला बचत गटांना १ लाख रुपयांचे फिरते भांडवल देणारी ‘नवसखी योजना’राबवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महसूल विभागाला शासनाचा कणा संबोधत, नागरिकांच्या सेवा जलदगतीने देण्याचा मानस व्यक्त केला. तर प्रदीप कंद यांनी हवेली तालुक्यातील पाणंद रस्त्यांच्या कामांबाबत समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयावर भर दिला. उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी प्रास्ताविकात हवेली उपविभागात देण्यात आलेल्या लाभांची माहिती दिली. या शिबिरात २० गावांमधील नागरिकांना ४५ विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच छताखाली देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!