मुलगी पाहायला गेले अन् नवरी घेऊनच परतले, अनावश्यक खर्चाला फाटा देत देशमुख-कुंदे परिवाराचा आदर्श

Swarajyatimenews

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा

शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) आजच्या काळात लग्न म्हणजे केवळ दोन जिवांचे मिलन न राहता, तो एक अवाढव्य आर्थिक सोहळा आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन बनले आहे. लाखो रुपयांची उधळण, डीजेचा कर्णकर्कश आवाज, पंचतारांकित जेवणावळी आणि मान-पानाच्या नावाखाली होणारी वरात या सर्वांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. मात्र, या सर्व बडेजावाला फाटा देत निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील देशमुख आणि कोतुळ (जि. अहिल्यानगर) येथील कुंदे परिवाराने निफाड येथे अवघ्या काही तासांत विवाह उरकून समाजासमोर एक परखड आदर्श ठेवला आहे.

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम अन् ऐतिहासिक निर्णय – निमगाव म्हाळुंगी येथील सेवानिवृत्त प्राध्यापक संजय देशमुख यांचा पुतण्या व कोतुळ येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश काशिनाथ देशमुख यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याच्यासाठी निफाड (जि. नाशिक) येथील दीपक संपतराव कुंदे यांची मुलगी कल्याणी हिला पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुलगी पसंत पडली आणि तिथेच साखरपुड्याचा प्रस्ताव आला. मात्र, प्रवासाचा वेळ आणि लग्नाचा अफाट खर्च टाळण्यासाठी उपस्थितांनी थेट लग्नाचाच विचार मांडला.

या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे, दोन्ही कुटुंबांनी सामाजिक बांधिलकी जपत ‘लोक काय म्हणतील?’ या मानसिकतेला बाजूला सारले. शाही लग्नांच्या नावाखाली होणारी पैशांची नासाडी आणि वऱ्हाडाची होणारी ओढाताण थांबवण्यासाठी पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष एस.झेड देशमुख, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक कैलास देशमुख, शिवाजी देशमुख, दिलीप देशमुख, राजेंद्र कुंदे, सेवानिवृत्त सैनिक वसंत देशमुख, बबलू देशमुख, संपत देशमुख, संजय देशमुख, रावसाहेब रोकडे, सयाजी देशमुख, भानुदास देशमुख, सुभाष देशमुख, सुरेश देशमुख या ज्येष्ठ मंडळींनी अत्यंत धाडसी पुढाकार घेतला.

कोणताही बडेजाव न करता, तातडीने गरजेपुरते कपडे व साहित्य खरेदी करून वधूच्या घराजवळील मंदिरात ब्राह्मणांच्या मंत्रघोषात आणि गोरज मुहूर्तावर हा विवाह संपन्न झाला. वधू-वरांनीही ज्येष्ठ मंडळींच्या या पुरोगामी निर्णयाला मनापासून साथ दिली.

समाजाला नवा संदेश – सध्याच्या स्पर्धेच्या युगात लाखो रुपये खर्च करून होणारे शाही सोहळे म्हणजे केवळ दिखावा ठरत आहेत. मात्र, साध्या पद्धतीने विवाह करूनही नात्यांची वीण घट्ट होऊ शकते, हे या दोन्ही परिवारांनी सिद्ध केले. अनावश्यक खर्च टाळून लावलेला हा विवाह केवळ एक सोहळा नसून, वाढत्या महागाईच्या काळात मध्यमवर्गीयांसाठी एक दिशादर्शक पाऊल आहे. या निर्णयाचे परिसरातून जोरदार कौतुक होत असून, अनिकेत आणि कल्याणीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!