धक्कादायक! चाकणमध्ये नराधम बापानेच केला १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Swarajyatimesnews

पीडितेच्या धाडसामुळे आरोपी जेरबंद

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा

चाकण: पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील दावडमळा येथे रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्या वडिलांनीच बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी वडिलाची नियत फिरली. त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. वडिलांच्या या कृत्यामुळे मुलगी प्रचंड हादरली होती, मात्र तिने खचून न जाता अत्यंत धैर्याने या परिस्थितीचा सामना केला. तिने स्वतः पोलीस स्टेशन गाठून आपल्यावर झालेल्या अन्यायाची सविस्तर माहिती पोलिसांना दिली.

पंधरा वर्षांच्या मुलीने सांगितलेली ही आपबिती ऐकून पोलीस अधिकारीही अवाक झाले. पीडितेच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत चाकण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि नराधम बापाला बेड्या ठोकल्या. सहसा कौटुंबिक बदनामी किंवा भीतीपोटी असे गुन्हे दडपले जातात, मात्र या मुलीने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी या नराधम पित्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे चाकण परिसरात स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे मत सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!