पुणे: घरगुती वीज कनेक्शन मंजूर करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणचा सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे आणि एक खाजगी इसम श्यामलाल असोकन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रंगेहाथ पकडले. ही धडाकेबाज कारवाई पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील महावितरण कार्यालयात करण्यात आली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका शासकीय विद्युत ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदार हे महावितरणशी संबंधित लायझनिंग आणि वीज कनेक्शन मंजुरीची कामे करतात. त्यांनी बुधवारी (४ जून) एका ग्राहकाच्या घरगुती वीज कनेक्शनसाठी अर्ज केला होता, जो सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्याकडे कार्यवाहीसाठी आला होता.
नरवडेने हे कनेक्शन मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे सुरुवातीला ३५ हजार रुपयांची लाच मागितली. नंतर तडजोडीअंती २५ हजार रुपयांवर ही रक्कम निश्चित झाली. याबाबतची तक्रार सोमवारी (२ जून) एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीने तातडीने सापळा रचला. आज गुरुवारी (५ जून) दुपारी महावितरण कार्यालय, स्पाईन सिटी उपविभाग-२, भोसरी येथे नरवडे आणि त्याच्या कार्यालयात उपस्थित असलेला श्यामलाल असोकन याला २५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी दोघांवर भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.