शिक्षकांकडून ११ हजार १११ रुपयांचा धनादेश; ‘माझी शाळा, माझा अभिमान’चा नारा
उदयकांत ब्राम्हणे
केंदूर-पाबळ गटातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक व भौतिक दर्जा उंचावून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘प्रफुल्लित ज्ञानमंदिर’ अभियानाला शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत करंदी येथील केंद्रशाळेच्या प्रांगणात करंदी परिसरातील सहा जिल्हा परिषद शाळांची सहविचार सभा पार पडली. यावेळी शिक्षकांनी अभियानाला पाठिंबा देत ११ हजार १११ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
सभेत मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी या शैक्षणिक चळवळीत शिक्षक पूर्ण ताकदीने सहभागी होतील, अशी ग्वाही दिली. आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांची स्पर्धा जागतिक स्तरावर असल्याने त्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. सतिश वाबळे यांनी वाबळेवाडी शाळेच्या गुणवत्ता वाढीचा अनुभव मांडला.
यावेळी प्रफुल्ल शिवले म्हणाले की, ‘मिशन ५३’ अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ५३ शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनविणे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय भाषांचे शिक्षण उपलब्ध करून देणे, हे अभियानाचे उद्दिष्ट आहे. ही चळवळ लोकसहभागातून यशस्वी करायची असून, ‘माझी शाळा, माझा अभिमान’ या भावनेतून शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
करंदी गावचे वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. शिवाजी महाराज दरेकर यांनीही ग्रामस्थ अभियानाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मंगेश काळे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका वैशाली थिटे यांनी केले, तर आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल वरपे यांनी मानले. यावेळी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
