अंदाजे ३० ते ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह महिनाभरापूर्वीचा असण्याचा प्राथमिक अंदाज; शिक्रापूर पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी
उदयकांत ब्राम्हणे
टाकळी भिमा (ता.शिरूर) येथील भिमा नदीच्या प्रवाहात अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता हा मृतदेह साधारणतः एक महिन्यापूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत.
टाकळी भिमा येथील भिमा नदीच्या प्रवाहात एका पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस पाटील प्रकाश करपे यांनी तातडीने शिक्रापूर पोलिसांना खबर दिली. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलीस उपनिरीक्षक कोळी यांच्यासह पोलिसांचे पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक विभागाचे प्रणवती पटले, अभिषेक फोंडे आणि पंकज कसुरे यांनी घटनास्थळी आवश्यक तपासणी करून पुरावे संकलित केले.
तसेच तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी शीतल थिटे, पोलीस कर्मचारी इथापे, गिरामकर, तसेच भारत भोसले, गणेश वाघधुळे, दत्तात्रय जाधव, पोलीस पाटील प्रकाश करपे आणि ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी व पंचनामा प्रक्रियेसाठी सहकार्य केले.
मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याचे सांगण्यात आले. मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत असल्याने आणि तो साधारणतः महिनाभरापूर्वीचा असण्याची शक्यता असल्याने, पोलिसांसमोर मृताची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मृतदेहाची ओळख, मृत्यूचे नेमके कारण आणि हा प्रकार अपघाती मृत्यू, खून अथवा अन्य कोणत्या कारणामुळे घडला, याचा तपास आता शिक्रापूर पोलीस करीत आहेत.
