शिक्रापूर (ता. शिरूर) सामाजिक बांधिलकी आणि रक्षणाचे वचन जपत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
या कार्यक्रमास पिंपळे जगताप येथील महिला पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे आणि बुरुंजवाडी येथील महिला पोलीस पाटील रुपाली शैलेश टेमगिरे यांनी उपस्थित राहून पोलीस अधिकाऱ्यांना राखी बांधली व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षेसाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक राहुल देशमुख व जितेंद्र पानसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले व हनुमंत गिरी, तसेच पोलीस हवालदार संदीप कारंडे, कृष्णा व्यवहारे आणि संदीप बनकर हे उपस्थित होते.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिला पोलीस पाटलांचे आभार मानत, परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासोबतच महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सदैव तत्परतेने पार पाडण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमामुळे पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील आपुलकीचा व विश्वासाचा धागा अधिक घट्ट झाला आहे.
